शिक्षण सचिव नंदकुमार यांची अखेर बदली

वंदना कृष्णा यांची निवड : सामान्य प्रशासन विभागात रवानगी

पुणे – राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय, रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय, शिक्षकांची बदली, सेल्फी हजेरी आदी वाद निर्माण करणारे निर्णय ज्यांच्या कालखंडात झाले असे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांची अखेर शासनाकडून बदली करण्यात आली आहे. त्याची राजशिष्टाचार अधिकारी म्हणून सामान्य प्रशासन विभागात रवानगी करण्यात आली आहे; तर शिक्षण सचिव या पदावर आता वंदना कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे.

-Ads-

गेल्या 3 वर्षांमध्ये शिक्षण आयुक्‍त पद हे अनेकदा बदलले, मात्र शिक्षण सचिवांची खुर्ची कायम होती. गेल्या 3 वर्षांत शिक्षण सचिवांबाबत शिक्षक, अधिकारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्‍त करण्यात येत होती. या सर्वांनी अखेर सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. येत्या काळात शाळाबंदीचा निर्णय मोठा वादाचा निर्णय ठरू शकत होता. त्यामुळेच हा निर्णय घेणारे व हा निर्णय घेत असताना राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याबाबत वक्‍तव्य करणारे नंदकुमार हे सर्वांच्याच टीकेचा विषय बनले होते. शिक्षण विभागातील कोणताही निर्णय असो तो नंदकुमार यांच्याशिवाय पुढे जातच नसल्याचे अधिकाऱ्यांचे खासगीत म्हणणे होते.

अनेक वादग्रस्त आदेश…
नंदकुमार यांच्या काळात अनेक वादग्रस्त आदेश देण्यात आले, त्यामध्ये शाळा बंदी, शिक्षक बदली, सर्व अभ्यासमंडळांची पुनर्रचना, बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय, म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षक आंदोलनाला लागलेले हिंसक वळण, सेल्फी हजेरीचा निर्णय, रात्रशाळा बंद करणार असल्याचे विधान, शिक्षकांना डेटा एन्ट्रीचे काम आदी निर्णयांचा समावेश आहे. निर्णयांमुळे राज्यातील शिक्षक मेटाकुटीला आले होते. त्यामुळेच शिक्षक आमदारांपासून, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अधिकारी या सर्वांकडूनच नंदकुमार यांच्या बदलीची इच्छा व्यक्‍त केली जात होती. अखेर निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सचिव बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता तरी शिक्षण विभागाला “अच्छे दिन’ येतील अशी आशा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)