शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल गरजेचे

रेडा- शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नेहरू उमराणी यांनी व्यक्‍त केले. इंदापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अध्यापक विकास कार्यक्रम (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम)च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध विद्यापीठातील 40 प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

डॉ. उमराणी म्हणाले की, देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडवणे काळाची नितांत गरज आहे. देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा सशक्त शिक्षण पद्धतीवर अवलंबून असून, त्यासाठी शिक्षणाची मूलभूत मानांकने ठरवून त्याचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे.शिक्षण हे केवळ परीक्षा पुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या जीवनाचा कायापालट करणारे शिक्षण समाजाला देणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे. सशक्त आणि शिकलेला तरुण देशाचे भविष्य घडवू शकतात. डॉ अरुण अडसूळ, प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी मागदर्शन केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ, संस्थेचे सचिव मुकुंद शहा उपस्थित होते. डॉ. गजानन ढोबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. रोहित लोंढे यांनी केले. प्रा. ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)