शिक्षण विभागात व्हॉट्‌स ऍप, फोनवरुन सूचनांचा भडिमार

शिक्षण विभागाच्या पत्रातही व्हॉट्‌सऍपचेच संदर्भ: अधिकृत अनाधिकृत कसे ठरविणार

पुणे – तंत्रस्नेही शिक्षक योजना राबविणाऱ्या शिक्षण विभागाने गेल्या काही काळापासूनच नविनच पायंडा पाडायला सुरुवात केली आहे. हल्ली शिक्षण विभागातील काही ठाराविक वरीष्ठ अधिकारी आणि पर्यायाने त्या खालोखालील कनिष्ठ अधिकारी शाळा, शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हॉट्‌स ऍप व फोनद्वारे सूचना देत आहेत. मात्र यामुळे अधिकृत काय आणि अनाधिकृत काय हे सगळेच सिध्द करणे अवघड होऊन बसले आहे.

कोणत्याही विभागाने एखादे पत्र काढले तर त्याला अधिकृत अधिकाऱ्याची सही असते, तारीख असते, आवक जावक क्रमांक असतो त्यामुळेच त्याला कायद्याचा आधार असतो. मात्र ही पत्र जणू इतिहासजमा करत शिक्षण विभागाकडून व्हॉट्‌स ऍप आणि फोनच्या माध्यमातून संदेश पोहचविण्याचे काम सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागातील अधिकाऱ्यांसाठी वेगळा व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार केला आहे. त्यावरून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत. तर काही अधिकाऱ्यांना थेट फोन करुन सूचनांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. मात्र यामुळे एकूणच काही वादग्रस्त निर्णयाबाबत अंमलबजावणी कशी करावी असे प्रश्‍न अंमलबजावणीच्या पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पडले आहेत.

नाशिकच्या शिक्षण विभागाकडून काढलेल्या पत्रात अशाच व्हॉट्‌स संदेश व फोनचा चक्‍क संदर्भ देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात एका शिक्षकाने आत्महत्या केली होती त्याला शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून दिलेल्या सूचनांनुसारच कारवाई केली असल्याचे खालच्या पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र आत्महत्या प्रकरणानंतर या अधिकाऱ्यांना हे अधिकृतरित्या पटवून देणे अवघड झाले होते.

मुख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारचे मेसेज येत असल्यामुळे आता दाद तरी कोणाला मागणार असा प्रश्‍न शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी विचारत आहे. शिक्षणमंत्री किमान यातरी बाबतीत लक्ष घालतील का, असा प्रश्‍न आता अधिकारी दबक्‍या आवाजात विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)