शिक्षण बचावाची सात दिवसीय पदयात्रा

भिडे वाडा ते शिक्षणमंत्र्यांच्या घरापर्यंतच्या पदयात्रेला सुुरवात

पुणे – आरटीईच्या नावाखाली राज्यातील सुमारे एक लाख शिक्षकांच्या भरतीवर गदा आणणे, अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान मिळावे, दिवस शाळेतील शिक्षकांना रात्र शाळेत घातलेली बंदी काढणे, वीस टक्‍के अनुदान मिळालेल्या शाळांना पुढचा टप्पा मंजूर करुन देणे या अशा मागण्यासांठी विधान परिषद सदस्य दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे व राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय पदयात्रेची सुरुवात सावित्रीबाईं फुलेंची शाळा भिडे वाडा येथून झाली.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण हे पार रसतळाला गेले असल्याचे तपशील देणारे असर सारखे अनेक अहवाल प्रसिध्द झाले आहेत. राज्यात कुठे गणिताचे, कुठे विज्ञानाचे तर सर्वत्र इंग्रजीच्या शिक्षकांचा तुडवडा आहे. शिक्षण विभागाकडे अशा पंधरा मागण्यांचे निवेदन घेऊन या पदयात्रेला सोमवारी भिडेवाड्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी साधारण दोनशे ते तीनशे शिक्षकांच्या उपस्थितीत या पदयात्रेला सुरुवात झाली. 17 ते 23 जुलै दरम्यान ही पदयात्रा काढण्यात येत असून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतील निवासस्थापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत अभ्यंकर, देशपांडे आणि सावंत हे जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या पंधरा मागण्यांमध्ये अंपग समावेशित शिक्षक, रात्र शाळेतील शिक्षक, अर्धवेळ शिक्षक, मुल्यांकन केलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांचा समावेश आहे. तसेच इंग्रजी शाळांना मान्यता देऊ नये असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)