शिक्षण क्षेत्रात सामाजिक संवेदनशिलतेची गरज – डॉ. गायकवाड

पिंपरी – शिक्षण क्षेत्रात सामाजिक संवेदनशिलता जागवून विसंगतीला आळा बसवायला हवा, असे प्रतिपादन मुंबईतील किर्ती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी. एन. गायकवाड यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रबोधनपर्वाच्या निमित्त आयोजित विचार प्रबोधन पर्वात जनजागृती शिक्षणाची, प्रगती समाजाची या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड, कार्याध्यक्ष नितीन घोलप, सचिव अनिल सौदाडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोडरमल, संजय ससाणे, विशाल कसबे, युवराज दाखले, अविनाश कांबीकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या परिसंवादात बोलताना डॉ.योगेश साठे यांनी शिक्षण व अर्थपूर्ण शिक्षण यातील फरक विषद केला. जीवन जगण्याच्या आवश्‍यकतेला अर्थपूर्ण हातभार लावण्यासाठी जे कौशल्य गुण आवश्‍यक आहेत, ते शिक्षणातून मिळावेत याकरीता प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या विविध योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा याकरीता जनजागृतीची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हे युग विज्ञान व प्रगतशिल तंत्रज्ञानाचे आहे. तेव्हा सर्वांनी शिक्षणाची कास धरावी. शिक्षणाची उद्‌दीष्ट्ये ठरविली पाहिजे. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित केल्यास त्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढेल, असे मत प्राध्यापक धनंजय भिसे यांनी व्यक्त केले.

डॉ. शशिकांत कसबे यांनी घराच्या अंगणावरुन घरातील व्यक्तींच्या संस्काराची व संस्कृतीची जाणीव होते. आदर्श शिक्षण व संस्कृतीचा वसा प्रत्येकाने घरात रुजवला पाहिजे असे सांगून शिक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. संजय धुतडमल यांनीही परिसंवादात आपले विचार व्यक्त केले व समाजातील प्रत्येकाने शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन गणेश क्षिरसागर यांनी केले.

तत्पूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रबोधनपर्वाच्या निमित्त आयोजित प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. लखन अडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम सादर केला. त्यानंतर ढोल-लेझीम स्पर्धा घेण्यात आल्या. त्यास प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. तसेच महापुरुषांच्या जीवनावरील देशभक्तीपर प्रबोधनपर गीतांच्या साजण बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या कार्यक्रमाने सांगता झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)