शिक्षण आयुक्‍तांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा

राज्य शासनाच्या शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलसह इतर विविध शैक्षणिक विषयांचा समावेश

पुणे – राज्य शासनाच्या शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलसह इतर विविध शैक्षणिक विषयांचा शिक्षण आयुक्‍त राज्यातील अधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी आढावा घेणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाने पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकडे शिक्षण विभागाने वाटचाल सुरू ठेवली आहे. उमेदवारांची नोंदणी पूर्वीच झालेली आहे. शैक्षणिक संस्थांना सुधारित बिंदूनामावली नोंदविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक व शैक्षणिक मागास संवर्गातील उमेदवारांसाठी जात बदलाची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. पवित्र पोर्टलवरील प्रक्रियेबरोबर इतर विविध शैक्षणिक विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 ते 2 यावेळेत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, महापालिका व नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी, पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून आढावा घेणार आहेत. दिलेल्या वेळेत जिल्ह्याच्या एनआयसी केंद्रावर व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी आवश्‍यक माहितीसह अधिकाऱ्यांनी उपस्थित राहवे, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी दिल्या आहेत.

पवित्र पोर्टलवरील कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करणे, सन 2017-18 च्या संच मान्यतेनुसार जिल्हा व विभागस्तरावर समायोजन व रुजू अहवालाचा आढावा घेणे, सन 2018-19 चा संच मान्यता अंतिम करणे, संच मान्यतेनुसार समायोजनाने दिलेल्या शिक्षक संस्थेने रुजू करून न घेतल्याने पद व्यपगत करणे, अनुदानासाठी अघोषित अशासकीय शाळांचे मूल्यांकन अहवालांच्या प्रस्तावांचा आढावा, डिबीटी पोर्टलच्या ऑनलाइन कारवाईचा आढावा घेणे, अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी समायोजनासाठी रिक्‍त पदे व अर्धवेळ ग्रंथपाल पदांची माहिती घेणे, उच्च माध्यमिक शाळांच्या वाढीव पदांच्या प्रस्तावाची माहिती घेणे या विविध विषयांचा शिक्षण आयुक्‍त राज्यातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. यासाठी विषय पत्रिकाही निश्‍चित करण्यात आलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)