शिक्षणाचा “दिल्ली पॅटर्न’ पिंपरीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालिकेतर्फे दिल्ली येथील शाळांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात महापौर, आयुक्त, शिक्षण समिती सभापती व सदस्य, विरोधी पक्षनेते आदी सहभागी झाले होते. दिल्ली येथील शाळांची गुणवत्ता, शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे देण्यात येणारे शिक्षण व त्या शाळांमधील काही उपक्रम पिंपरी-चिंचवड महापालिकेत राबविण्यात येणार आहे. यामुळे, महापालिका शाळांमध्ये पुढील काही दिवसात निश्‍चितपणे बदल होईल, असा विश्‍वास शिक्षण समितीने व्यक्त केला आहे.

शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे म्हणाल्या, “”दिल्ली दौऱ्यात समितीने अनेक शाळांना भेट दिल्या. यामध्ये, एन. पी. बेंगॉल, नवयुग स्कूल, एन.पी. प्रायमरी स्कूल तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या ठिकाणी जाऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. दिल्ली येथील स्मार्ट सिटीच्या शाळांचा दर्जा उत्तम आहे. त्या ठिकाणी शाळांना डिजीटल पध्दतीचे शिक्षण दिले जाते. तसेच, या शाळांमध्ये बायोमेट्रिक पध्दतीने विद्यार्थ्यांनी हजेरी घेतली जाते. वाय-फाय, ग्रीन बोर्ड, स्पर्धा परीक्षा केंद्र, संगणक कक्ष आदी उपक्रम अद्ययावत पध्दतीने राबवितात. तसेच, दिल्लीतील सर्व शाळांच्या वर्गामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. या शाळांमधील उन्नती प्रकल्प हा सर्वात प्रगतशील उपक्रम आहे. तसेच, या शाळेतील परीक्षा टॅबवर प्रत्येक आठवड्याला घेतल्या जातात. संपूर्ण शाळांचे “मॉनेटरिंग’ एकाच कार्यालयात केले जात असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना व शाळा प्रशासनाला संपूर्ण शाळेची माहिती एकाच “क्‍लिक’वर मिळत आहे”.

-Ads-

शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, “”दिल्ली येथील शाळांमधील शिक्षकांना प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी दोन तास प्रशिक्षण दिले जाते. याच धर्तीवर उन्नती प्रकल्प व शिक्षक प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न महापालिका शाळांमध्ये केला जाणार आहे. त्या ठिकाणच्या सर्व शाळा सकाळी 8 ते 2 या वेळेतच भरविण्यात येतात. या शाळांमध्ये परीक्षा टॅबवर घेऊन लगेच दुसऱ्या विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पध्दतीने उत्तरपत्रिका तपासण्यात येतात. यामुळे, विद्यार्थ्याची गुणवत्ता कुठे कमी पडत आहे याची माहिती लगेच मिळते. तसेच, या शाळांकडून क्रीडा क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जाते. या शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असून त्यामधील चांगले उपक्रम निश्‍चितपणे आपल्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यास उपयोग होईल”.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)