शिक्षणसेवकपदाच्या कालावधीसाठी शुद्धिपत्रक

राज्य शासनाने पाच करून तीन वर्षे कालावधी केल्याची सुनील गाडगे यांची माहिती

नगर: राज्य शासनाने 16 मे 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकामधील एका वाक्‍यामुळे शिक्षण सेवक पदाचा कालावधी तीन वर्षांवरून पाच वर्षे झाल्याचे स्पष्ट होत होते. मात्र, परिपत्रकातील संदिग्ध भाषेमुळे संभ्रम निर्माण झालेला होता. अखेर शुक्रवारी शासनाने शुद्धिपत्रक काढून शिक्षण सेवक पदाचा कालावधी तीन वर्षेच राहिल, असे स्पष्ट करून गोंधळ दूर केला आहे. शिक्षक भारतीचे नेते सुनील गाडगे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर सुरूवातीची तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागते. या कालावधीमध्ये महिना आठ हजार रूपये इतके मानधन दिले जाते. शिक्षण सेवकाचा हा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये कायम केले जाते. राज्य शासनाने 16 मे 2018 रोजीच्या परिपत्रकातील शेवटचा परिच्छेद रद्द केला असून शिक्षण सेवक, कृषि सेवक व ग्रामसेवक ही सर्व पदे भरताना ती प्रचलित कार्यपध्दतीनुसार भरण्यात यावीत असे सुधारीत वाक्‍य टाकले आहे.

शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विजय लंके, महिला राज्यप्रतिनिधी शकुंतला वाळुंज, ग्रंथपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गाडगे, श्रीकांत गाडगे यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन परिपत्रकामध्ये तत्काळ सुधारणा करा, शिक्षण सेवक कालावधी तीन वर्षांचाच होता. तो पाच वर्षे कसा झाला? असे सुनील गाडगे यांनी विचारले. हा कालावधी कमी करुन तीन वर्षेच ठेवावा अशी मागणी केली होती. सरकारने शुद्धिपत्रक काढुन शिक्षण सेवक कालावधी पुन्हा तीन वर्षावर आणला आहे.

शिक्षण सेवक, कृषि सेवक व ग्रामसेवक या पदांवर पहिली पाच वर्षे मानधनावर काम करावे लागेल, असा अर्थबोध होत होता. यामुळे शिक्षक भारती संघटनेमध्ये नाराजी पसरली. शिक्षकांच्या नोकरी भरतीला गेल्या सहा वर्षांपासून स्थगिती देण्यात आली आहे. अनेक पात्रताधारक उमेदवार शिक्षक भरतीवरील स्थगिती उठण्याची वाट पाहत आहेत. त्याचवेळी शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांऐवजी पाच वर्षेकाम करावे लागण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली होती. यापार्श्‍वभूमीवर शिक्षण सेवक पदाचा कालावधी पूर्ववत तीन वर्षे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

शिक्षक भरती कधीपासून…

राज्यात तीन ते चार लाख डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवार आहेत. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर स्थगिती असल्याने त्यांना नोकरीसाठी वणवण करावी लागत आहे. शिक्षक पात्रता (टिईटी), शिक्षक अभियोग्यता आदी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भरती सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र त्याचवेळी शिक्षण सेवक पदाचा कालावधी तीन वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. या पार्श्‍वभूमीवर शासनाने शुद्धिपत्रक काढून शिक्षण सेवक पदाचा कालावधी पूर्ववत केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता लवकरात लवकर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेकडून करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
3 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)