शिक्षक भरतीवरील निर्बंध उठविले

पुणे – राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीवरील 50 टक्‍के निर्बंध उठविण्यात आले असल्याने आता शिक्षकांची रिक्‍त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात शासकीय व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या शाळा मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्‍त पदांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. सुमारे 25 हजार शिक्षकांची पदे रिक्‍त असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून पूर्वी देण्यात आलेली आहे. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी शासनाकडून नवीन पद निर्मितीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. तसेच रिक्‍त पदे भरण्यास काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. शिक्षक व अन्य संवर्गातील एकूण रिक्‍त पदांच्या 75 टक्‍के इतक्‍या मर्यादेत पदे भरण्यास पूर्वीच मुभा देण्यात आली होती. दुष्काळामुळे पडत असलेला अधिकचा आर्थिक भार लक्षात घेता 11 जानेवारी, 2016 च्या शासन निर्णयाद्वारे 75 टक्‍के ऐवजी 50 टक्‍के पर्यंतच पदे भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाने शिक्षक भरती पारदर्शकपणे करण्यासाठी पवित्र पोर्टल प्रणाली कार्यान्वित केली आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रामुख्याने शिक्षकांची नोकरी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात अडचण येऊ नये. यासाठी त्या-त्या अर्हतेच्या व विषयाचे शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. राज्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी शाळांमधील शिक्षक पद भरती एकत्रितरित्या करण्यात येणार आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि शिक्षणाची मानवी आयुष्यातील महत्त्व विचारात घेता शिक्षकांची पदे भरणे आवश्‍यक असल्याचा विचार शासनाकडून करण्यात आला आहे.

शासनाने शिक्षकांची रिक्‍त पदे भरण्यावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्याबाबातचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी बुधवारी जारी केले आहेत. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती व खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा व अध्यापक विद्यालयांमधील शिक्षक भरतीतील अडचण आता दूर झाली आहे.

संच मान्यतेनंतर अतिरिक्‍त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर देखील शिक्षक अतिरिक्‍त राहिल्यास अतिरिक्‍त संख्येएवढी त्याच गटातील शिक्षकांची पदे ठेवण्यात यावी. दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नवीन पदे भरण्यात येऊ नयेत. 200 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार 50 टक्‍केपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यासच ती पदे भरण्यात यावीत. उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुकडी निहाय मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयांशी संबंधित सर्व तुकड्यांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन पदे भरण्यात यावी, अशा अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)