शिक्षक भरतीकडे “डोळेझाक’

महापालिका आयुक्‍तांना इशारा : …अन्यथा विद्यार्थ्यांना घेवून आंदोलन

पिंपरी – महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला 50 शिक्षकांची गरज असताना भरती प्रक्रिया राबविण्यास मुद्दामहून विलंब केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांचा रोष सहन करण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर आली आहे. येत्या आठ दिवसांत शाळांच्या मागणीनुसार शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा दिल्यास आयुक्‍त कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवून आंदोलन करणार आहे, असा इशारा अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी दिला आहे.

बारणे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या 18 माध्यमिक विद्यालयांमध्ये 50 शिक्षकांची कमी भासत आहे. याबाबत जून 2018 पासून शिक्षण विभागाला माहिती मागितली. परंतु, ती देण्यास टाळाटाळ केली. विचारपूस केल्यानंतर उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. मुळात पालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यातच चालू शैक्षणिक वर्षातील तीन महिन्यांचा कालावधी संपला आहे. तरीही, विद्यालयात शिक्षक रुजू झाले नाहीत. आणखीन विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न बारणे यांनी उपस्थित केला आहे.

मानधन तत्त्वावर पन्नास शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिध्द केली. उमेदवारांचे अर्जही घेण्यात आले. “मेरिट’नुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यात हस्तक्षेप होऊ लागल्याने ही भरती प्रक्रीया रखडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकी अडचण काय हेच लक्षात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आठ दिवसांत शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी. अन्यथा पालिकेतील आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांची शाळा भरवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बारणे यांनी दिला आहे.

महापालिकेला वेतनश्रेणी परवडत नसेल, तर त्यांनी आम्हाला सांगावे, नगरसेवकांच्या वेतनातून आम्ही शिक्षकांची नेमणूक करू. परंतु, मुलांचे शैक्षणिक नुकसान करू नये. “मेरिट’नुसार भरती प्रक्रिया राबवावी. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणार आहे.
– कैलास बारणे, गटनेता, अपक्ष आघाडी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)