शिक्षक बॅंकेसमोर ‘तोंडझोडो’ आंदोलन

गुरुकूल मंडळाचा यांचा इशारा; पठाणी वसुलीमुळे सभासद हवालदिल

नगर –  उशिरा होणाऱ्या पगारामुळे शिक्षक त्रस्त झालेले असतानाच शिक्षक बॅंकेच्या पठाणी वसुलीमुळे ते हवालदिल झाले आहेत. सत्ताधारी सत्तेत आल्यापासून वेगवेगळे फंडे वापरून सभासदांच्या खिशात हात घालीत आहेत. त्यांच्या अशा धोरणांमुळे सभासदांना स्वतःचेच तोंड झोडून घेण्याची वेळ आली आहे. सत्ताधारयंना निवडून दिल्याचा पश्‍चाताप म्हणून सभासद बॅंकेसमोर लवकरच ‘तोंड झोडो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुरुकूल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे, शिक्षकनेते रा.या.औटी, नितीन काकडे, संजय धामणे, वृषाली कडलग, लक्ष्मण टिमकारे, गजानन जाधव, राजेंद्र पटेकर आदींनी दिला आहे.
सभासदांना विश्वासात न घेता बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी परस्पर स्वहिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. वसुलीचे अगम्य आकडे पाहून शिक्षकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. दर महिन्याला कर्जवसुलीचे बदलणारे आकडे, हप्ते जावूनही कर्जरकमेत बदल न होणे, वर्षातून दोन वेळेस पाचशे रुपये कपात, महिन्याला मयत निधी दोनशे रुपये कपात असूनही पुन्हा कटुंबकल्याण योजनेच्या नावाखाली दरमहा शंभर स्रपये कपात केली जाते. अत्यल्प व्याजदर देणाऱ्या ठेवीमध्ये दरवर्षी भरघोस वाढ अशा वेगवेगळ्या कपातीच्या योजना आणून संचालकांनी सभासदांचे खिसे कापण्याचे उद्योग सुरू केले आहेत. मी लवकरच सेवानिवृत्त होणार आहे, असे भावनिक आवाहन करून रोहोकलेंनी सत्ता मिळवली; परंतु कर्ज वाढवण्यापेक्षा व्याजदर कमी केल्यास शिक्षकांचा खऱ्या अर्थाने फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. संचालक मात्र स्वच्छ कारभाराचे खोटे ढोल बडवण्यात मग्न आहे. मयत निधीचा वापर फक्त मयतासाठी न करता स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या चार कोटी रुपये कर्जाची वसुली करणार की नवीन सुरू केलेल्या योजनेतून हे कर्ज फेडणार, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी शिंदे, औटी, काकडे, धामणे, कडलग, टिमकारे, जाधव, पटेकर आदींनी केली आहे. कुणीही कर्ज बुडवून पळाले तर त्याचे कर्ज इतर सभासदांनी फेडायचे का, असा सवाल त्यांनी केला आहे. सेवानिवृत्ती जवळ आलेले रोहोकले आताच बाहेरच्या पुढाऱ्यांशी संधान साधून बॅंकेतून बाह्य राजकारणासाठी लागणाऱ्या भांडवलाची तरतूद करत आहेत. त्याचे चटके मात्र सभासद भोगत आहेत. आरोपाचा खुलासा द्यायला कार्यकर्त्याचे नाव वापरण्यासाठीसुद्धा रोहोकले यांना पैसे द्यावे लागत आहेत, असा आरोप करून ही पठाणी वसुली थांबवावी, अशी मागणी गुरुकूलचे बाळू खेडकर, मिलिंद पोटे, अशोक कानडे, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर, जालिंदर गोरे, मधुकर मैड, अशोक आगळे, दशरथ पवार, सोमनाथ येलमामे, ज्ञानेश्वर बोडखे, अनिल ओहोळ, शरद धलपे, बी.के.बनकर, सचिन झावरे, संतोष डमाळे, सीताराम गव्हाणे, सतीश अंधारे, विलास गोरे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)