शिक्षक बॅंकेला साडेतीन कोटींचा तोटा

डॉ. संजय कळमकर यांचा आरोप; सत्ताधाऱ्यांकडून सभासदांची दिशाभूल

नगर – स्वच्छ व पारदर्शी कारभाराचा आव आणणाऱ्या शिक्षक बॅंकेच्या अध्यक्ष व त्यांच्या संचालकांचे बिंग अखेर फुटले आहे. शिक्षक बॅंकेला तब्बल तीन कोटी 50 लाख रुपये तोटा झाल्याचे रिझर्व बॅंकेने जाहीर केले आहे; परंतु बॅंकेला दीड कोटी रुपये नफा झाल्याचे सांगून संचालक मंडळाने जिल्हयातील सर्व सभासदांची फसवणूक केली आहे. सभासदांचा विश्वासघात करणाऱ्या व सेवानिवृतीला 11 महिने अवधी असलेल्या अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी तातडीने पदावरून पायउतार व्हावे, अन्यथा त्यांच्या केबिनला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.
डॉ. कळमकर, समितीचे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, गुरुकुलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, उदयकुमार सोनावळे, अंबादास मंडलिक, संजय कडूस यांनी बॅंकेचे व्यवस्थापक देशमुख यांची भेट घेऊन रिझर्व्ह बॅंकेने शिक्षक बॅंकेवर ठेवलेल्या दोषारोपपत्राची मागणी केली; परंतु ते पत्र गोपनीय ठेवण्याचे संचालक मंडळाने सांगितल्याने त्यांनी ते पत्र देण्यास असमर्थता दर्शवली. शिक्षक बॅंकेचा तोटा रिझर्व्ह बॅंकेने चव्हाटयावर आणला का या प्रश्नावर मात्र मौन पाळले. रिझर्व्ह बॅंकेने सभासदांना लाभांश देण्यावर अटी लादल्या आहेत. शिवाय संचालक मंडळाने दहा हजार रुपयांवर कुठलाही खर्च करू नये, असे निर्बंध घातले आहेत. संचालकांनी बाहेरून स्वच्छतेचा आव आणून वारेमाप उधळपट्टी केल्याचा हा परिणाम आहे. बॅंकेवर निर्बंध असतानाही नेवासा शाखेचे तब्बल 25 लाख रुपयांचे काम संचालकांनी आर्थिक फायद्यासाठी सुरू केले आहे. शिवाय निवृत्त होण्याआधी विकास मंडळाची इमारत बांधण्याचा हट्ट रोहोकले यांनी धरला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी बॅंकेची पत व प्रतिष्ठा घालवणाऱ्या रोहकले यांनी या निर्बंधाची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर ढकलली आहे, असे आरोप कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहेत.
या बॅंकेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिमा लावून त्याआडून भ्रष्टाचार करणाऱ्या रोहोकले यांनी आता जास्त बनवेगिरी न करता पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी शिक्षक नेत्यांनी केली आहे. रा. या. औटी, नितिन काकडे, वृषाली कडलग, लक्ष्मण टिमकारे, गजानन जाधव, सीताराम सावंत, भास्कर नरसाळे, विजय महामुनी, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर यांनी सत्ताधाऱ्यांनी पायउतार न झाल्यास बॅंकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

लोका सांगे ब्रम्हज्ञान…

“”कुणाचेही ऐकायचे नाही. चुकीचे असले तरी माझेच खरे म्हणून पदाला चिकटून राहायचे व स्वप्रतिमा स्वच्छ असल्याचा आभास निर्माण करायचा, ही रोहोकले यांची जुनी सवय आहे. शिक्षकांच्या बदली धोरणावर बोलणाऱ्या रोहोकले यांनी बॅंकेतील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीने बदल्या केल्या. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशी त्यांची वृत्ती आहे.”
– संजय कळमकर
शिक्षक नेते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)