शिक्षक पदांच्या बिंदूनामावलीच्या प्राथमिक तपासणीसाठी शिबिर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक पदांच्या बिंदूनामावलीच्या प्राथमिक तपासणीसाठी विद्यापीठातील आरक्षण कक्षात विशेष शिबिर सुरू करण्यात आले असून हे शिबिर 12 जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडून महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्‍त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी महाविद्यालयांनी बिंदूनामावली तयार करून त्याची विद्यापीठातील आरक्षण कक्षाकडून प्राथमिक तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडून त्याची अंतिम तपासणी करणेही आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राथमिक तपासणी करून घेण्यासाठी विद्यापीठाने पुणे शहर, पुणे ग्रामीण, नाशिक, अहमदनगर या भागातील अनुदानित महाविद्यालयांसाठी मंगळवार (दि.8) पासून शिबिर सुरू केले आहे. महाविद्यालयांनी 1 ऑक्‍टोबर, 2017 च्या विद्यार्थी संख्येनुसार पद निश्‍चिती सादर करणे गरजेचे आहे. मंजूर, कार्यरत व रिक्‍त पदाचा घोषवारा सादर करावा, बिंदूनामावलीत कायमस्वरूपी शिक्षकांच्या नोंदींचाच समावेश करावा, अपंग प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदांचा गोषवाराही सादर करावा, पूर्ण पदे भरली असल्यास महाविद्यालयांनी विद्यापीठाला तशी माहिती सादर करावी, अशा सूचना विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाच्या उपकुलसचिवांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

पूर्वी बिंदूनामावली तपासूण घेतलेल्या कार्यवाहीचा अहवालही महाविद्यालयांनी सादर करणे बंधनकारक आहे. त्यात निवड समितीचा अहवाल, शिक्षक मान्यतेचे पत्र, पदे भरण्याची कार्यवाही झाली नसल्यास किंवा निवड झालेला उमेदवार रुजू झालेला नसेल, तर याबाबतची कागदपत्रे खुलाशासह सादर करावीत, कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांच्या शिक्षक मान्यतेच्या प्रतीची छायांकित प्रतही सादर करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

बिंदूनामावलीची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर दोन दिवसांत मागासवर्गीय कक्षाच्या साहाय्यक आयुक्‍तांकडून अंतिम तपासणी करून घेतल्यानंतरच महाविद्यालयांना शिक्षकांची पदे भरण्याची पुढील कार्यवाही करता येणार आहे, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)