शिक्षक दिन विशेष (प्रभात ब्लॉग)

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा दर्जेदार समाजाचा निर्माणकर्ता आहे. लहान बालकांमध्ये देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्त्तन करण्याचे कार्य शिक्षकाला करायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, “ज्या देशात निस्वार्थी, निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते. तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात.” आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.

भारतीय संस्कृतीत वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अतिउच्च स्थान दिल्याचे दिसून येते. गुरूंना देवाच्या स्थानी मानले आहे. ‘गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा:..’ ही त्याचीच प्रचीती आहे. देतो तो देव! ही भावना आपल्याकडे सर्वत्र दिसून येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील आपल्या ग्रामगीतेत सांगतात कि, गुरुजींनी द्यावे ऐसे धडे, आपुला आदर्श ठेवोनी पुढे, विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी.

गुरूंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची असते आणि आपली संस्कृती देखील तसेच सांगत आली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, “जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन’. हे तर खरे गुरुचे कार्य आहे. ही वृत्ती घेऊन शिक्षकाने मार्गक्रमण करावे. याकरिता आपल्याकडे पूर्वीच्या काळात आदर्श मानली गेलेली गुरुकुल पद्धत होती. यात आश्रमात राहून गुरूच्या मार्गदर्शनात, निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना ज्ञान, कला, क्रीडा, विद्या यांचे अध्ययन दिले जायचे. आज बदलत्या काळात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. आज चहूबाजूंनी माहितीचा प्रचंड विस्फोट होत आहे. भौगोलिक बदल होत आहेत, नवनवे वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक, वैज्ञानिक व भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. याची अद्ययावत माहिती आज करून घेणे गरजेचे आहे.

पूर्वी गावात शिक्षक सांगेल तेच ज्ञान खरे अशी परिस्थिती होती. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम शिक्षक करतो ही भावना होती आज मात्र ही संकल्पनाच बदलली आहे. आता विद्यार्थ्याची पाटी कोरी नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटकं, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाईल आणि भोवतालचा परिसर यातून शिक्षकांच्या आधीच विद्यार्थ्यांना प्रचंड माहिती मिळण्याचे हे युग आहे. त्यातील कोणती माहिती विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर पक्की करायची व कोणती माहिती काढून टाकायची याचे भान शिक्षकाने ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने शिक्षणाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे.

डॉ.राधाकृष्णन नेहमी म्हणायचे, शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तक मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो असे ते म्हणायचे. विद्यार्थ्याला माहित नव्हते ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याने मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन त्याने कसे करवून घ्यायचे ते सांगणे म्हणजे शिक्षण होय. त्याला योग्य आचरण करायला लावणे म्हणजे शिक्षण होय. हे आज लक्षात घेणे गरजेचे आहे.

शिक्षक म्हटले कि आपल्याला आठवते, रंजल्या गांजल्या समाजाला उन्नती अवस्थेला नेण्यासाठी प्रयत्न करणारे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे हा मंत्र देणारे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, बहिणाबाई, रामदास हे देखील त्या अर्थाने गुरूच होय. शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या न्याय व हक्कासाठी झगडणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, दीन-दलितांच्या शिक्षणाची प्रेरणा बनणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या अनुताई वाघ असेल वा घरातील भांडी विका पण मुलाबाळांना शिक्षण द्या म्हणणारे, लोकभाषेतून, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराज यांना तर चालते बोलते विद्यापिठाच म्हणावे लागेल. आज समाजाला खरोखर गरज आहे अशा शिक्षकांची. भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार या सर्वांची पाळेमुळे उखडून टाकण्यास समर्थपणे उभे राहणारे विद्यार्थी या राष्ट्राच्या प्रगतीसाठी घडविणारे शिक्षक गरजेचे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात जवळपास सातशे गावांमध्ये काही बदल घडवू पाहणारे, ग्रामीण भागाचा कायापालट वा परिवर्तन घडवून आणण्याची जिद्द असलेले जवळपास साडेतीनशे तरुण गावाच्या ‘विकासाचा मार्ग शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधून जातो’ याची जाण ठेवून प्रशासन, महाराष्ट्रातील प्रतिथयश उद्योजक, सामजिक संस्था व गावकऱ्यांच्या सहकार्याने गावे बदलण्याचा, सक्षम, स्वयंपूर्ण व आदर्श नवा ग्रामीण महाराष्ट्र बनविण्याचा भाग बनू पाहत आहेत.

गावातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा, अध्यापनाच्या नव्या पद्धती, कला, क्रीडा, साहित्य यासह सर्वांगीण विकासाची क्षमता असलेली ग्रामीण भागात नवी पिढी घडविण्यासाठी गावात राहून, विद्यार्थी, तरुण यांच्या सोबत शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत देखील संवाद साधत आहे. ‘आज समाजात सर्वच बिघडलं आहे’ असा सूर असलेल्या काळात या सर्व मिणमिणत्या काजव्यांना घेऊन ग्राम परिवर्तनाची लढाई लढतोय. हे ग्राम प्रगतीचे पाऊल असेच पुढे पडत राहण्याच्या उद्दिष्टाने आजचा शिक्षक दिन चिंतन दिन म्हणून साजरा करून समाजात आपले स्थान सर्वांत उंच बनविण्यासाठी आपण सर्वच कार्यरत व कटिबद्ध राहू हीच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली ठरेल.

– निकेश आमने, यवतमाळ
(लेखक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए. अर्थशास्त्र विषयात झालेले आहे.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)