पुणे – राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटना महामंडळाच्या वतीने राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर गेल्या 14 वर्षांपासून बंदी आहे. यामुळे शाळांमधील प्रशासकीय व इतर सर्वच कामे ठप्प झाली आहेत. माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी, कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षानंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती विनाअट त्वरीत लागू करावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना तत्काळ मान्यता देण्यात यावी, वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, सेवेत असताना शैक्षणिक पात्रता वाढविणाऱ्या सर्व प्रकारच्या पदावर वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा, जूनी पेन्शन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांची अतिप्रदान रक्कम वसूली थांबविण्यात यावी, अशा मागण्या संघटनेकडून शासनाकडे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
अर्थ खात्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध व आश्वासित प्रगत योजनेच्या प्रस्तावास वारंवार त्रुटी काढल्या जात असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, असेही खांडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा