शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

शिक्षणमंत्र्यांची घोषणा; आकृतीबंधाला पंधरा दिवसात मान्यता

पुणे – राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आकृतीबंधाला 15 दिवसात मान्यता देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यामुळे 17 हजार 255 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पद भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्‍त पदे याबाबतच्या तपशिलांचा एकत्रित आकृतीबंध तयार करण्यात येतो. शासनाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतरच प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू होते. 23 सप्टेंबर, 2013 च्या सुधारित आकृतिबंधातील त्रुटींबाबत फेब्रुवारी 2015 मध्ये शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने जुलै 2015 मध्ये अहवालही सादर केला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटना महामंडळाची समितीबरोबर अनेकदा चर्चाही झाली होती. मात्र कोणताही निर्णय न घेता केवळ आश्‍वासनेच देण्यात आली होती. त्यामुळे महामंडळाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नुकतेच मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाची दखल घेऊन राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तावडे यांची भेट घेऊन सविस्तरपणे बैठकीत चर्चा केली. संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यावेळी उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतरच्या पुढील 15 दिवसात आकृतीबंधाला मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी घोषणा तावडे यांनी विधान परिषदेत केली. या घोषणेमुळे शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीतील अडथळा आता दूर होण्याची शक्‍यता आहे.

30 हजार कर्मचाऱ्यांना अनुदानाचा लाभ

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या 30 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी 275 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली आहे. एकूण 2 हजार 907 शाळांमधील 23 हजार 807 व 4 हजार 319 तुकड्यांमधील 5 हजार 352 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे. यात अघोषित 1 हजार 279 शाळा व 1 हजार 867 तुकड्यांचा समावेश आहे. यातील 9 हजार 901 शिक्षक व 411 शिक्षकेत्तर कर्मचारी व 11 अर्धवेळ शिक्षक कार्यरत आहेत. 19 सप्टेंबर 2016 नुसार 20 टक्‍के अनुदान प्राप्त शाळांना पुढील 20 टक्‍के अनुदानही देण्यात येणार आहे. याचा लाभ 1 हजार 628 शाळांमधील 14 हजार 363 शिक्षक व 2 हजार 452 तुकड्यांमधील 4 हजार 884 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा फायदा मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)