शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी

शिक्षक निलंबित : श्री शिवाजी प्राथमिक लष्करी शाळेतील घटना

पुणे – चित्रकलेचा गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. यात विद्यार्थ्याला जबर जखम झाली असून त्याच्या चेहऱ्यावर परिणाम झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिक्षकाला शाळा प्रशासनाने निलंबित केले आहे.

शिवाजीनगर येथे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी या संस्थेची श्री शिवाजी प्राथमिक लष्करी (एसएसपीएमएस) शाळा आहे. या शाळेत इयत्ता सहावीच्या “ब’ वर्गात प्रसन्न शैलेंद्र पाटील हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तो मुळाचा इंदापूर तालुक्‍यातील जांभ या गावचा रहिवासी आहे. त्याला बेदम मारहाण केल्याची तोंडी तक्रार त्याचे पालक शैलेंद्र शंकरराव पाटील यांनी मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मारहाण करणाऱ्या संदीप व्ही. गाडे या शिक्षकाला निलंबित केले आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे, अशी मागणी नातलगांनी केली आहे.

प्रसन्न पाटील याचे पालक शैलेंद्र पाटील यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली आहे. “माझा मुलगा प्रसन्न याचे या शाळेत प्रवेश घेतल्याचे हे पहिलेच वर्ष आहे. मारहाण झाल्याची घटना ही पंधरा दिवसापूर्वी घडली आहे. मुलगा दिवाळी सुट्टीसाठी घरी आला होता. त्यावेळी त्याने घटनेची काहीच माहिती दिली नाही. नंतर मात्र त्याच्या चेहऱ्यात बदल जाणवू लागला. त्यावेळी मुलाने सर्व हकिकत सांगितली, असे पाटील यांनी स्पष्ट केले. माझ्या मुलाची चित्रकलेची वही काही मुलांनी फाडली होती. ही फाटलेली वही पाहून व गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून संदीप गाडे या शिक्षकांने मुलाला बेदम मारहाण केली. यामुळे मुलाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्याचा एक डोळा उघडत नाही व चेहऱ्याच्या एका बाजूची काहीच हालचाल होत नाही. मुलाच्या गालावरही चापट्या मारण्यात आल्या असून हातावर व पोटावर चिमटे काढून गुद्दे मारण्यात आले आहेत,’ असे पाटील यांनी सांगितले.

मुलाला उपचारासाठी बारामती येथील मुथा डॉक्‍टरांकडे दाखल केले होते. मात्र, त्यांनी पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकशी करून कारवाई करणार
प्रसन्न पाटील या विद्यार्थ्याला संदीप गाडे या चित्रकला शिक्षकाने मारहाण केल्याची तक्रार शैलेंद्र पाटील या पालकांनी केली आहे. या तक्रारीची माहिती घेतली असता यात गाडे हा शिक्षक दोषी आढळून आला आहे. त्यामुळे गाडे या शिक्षकाला सेवेतून निलंबित केले आहे. शासकीय नियमानुसार चौकशी समिती नेमून प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्वांचे जबाब नोंदवून घेण्यात येतील. समितीच्या अहवालानुसार पुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी स्पष्ट केले. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यावर वैद्यकीय उपचार करण्याची सर्व जबाबदारी शाळाच घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षकाने चूक केली कबूल
“आमच्या लष्करी शाळेत शिस्त ही महत्त्वाची मानली जाते. माझ्या हातून विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे. माझ्याकडून अनावधानाने ही चूक घडली आहे. मी विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक मारहाण केलेली नाही. मला क्षमा करा,’ असे म्हणत संदीप गाडे या चित्रकला शिक्षकाने आपली चूक कबूल केली व पालकांची माफीही मागितली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)