शिक्षकांनी विद्यार्थ्यांपुढे अद्ययावत असणे आवश्‍यक

अकोले – अभ्यासक्रमाचे स्वरूप सातत्याने बदलणे हा प्रक्रियेचा भाग आहे. नव्याने शिकण्याची संधी त्यातून मिळते. बदलत्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांपुढे अद्ययावत होणे आवश्‍यक असल्याने शिक्षकांचा अभ्यास जरुरीचा आहे,” असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे पाटील यांनी केले.

अध्ययन-अध्यापनातील बदल-अभ्यासक्रमाचे नियोजन आणि गुणवत्ता वाढ या विषयावरील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी आणि परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित संस्थेतील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. आंबरे पुढे म्हणाले, “”शिकविण्यात स्वारस्य असेल तर गुणवत्ता वाढते. शैक्षणिक दर्जा टिकविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. नवी पिढी जागृत आहे. जागृकता तसेच गांभीर्य ही शिक्षकांची मूल्ये आहेत.

संस्थेचे सचिव यशवंतराव आभाळे म्हणाले, “”उद्याचा विद्यार्थी घडविताना खबरदारी घ्यावी लागेल. आजचा शिक्षक हा शिक्षकच असावा; पुढारी असणे अथवा होणे आवश्‍यक नाही. काळाच्या प्रवाहात जे बदलतील तेच टिकतील. उत्तम अभ्यासपूर्ण अध्यापनाबरोबरच शिक्षकांचा फावला वेळ हा ग्रंथालय, तसेच संदर्भीय अभ्यासात व्यतित व्हायला हवा. अध्यापनात तंत्रज्ञानाचा योग्य वापर हवा, दर्जा टिकावा, हक्काच्या जाणीवेबरोबरच कर्तव्याचे भान असावे.”
खजिनदार माजी प्राचार्य एस. पी. देशमुख म्हणाले, “”विद्यार्थी संस्कारक्षम घडविण्याच्या कामी शिक्षकांची प्रतिमा दखलप्राप्त ठरते. अध्यापनातील उत्तम कृतीने गुणवत्ता वाढीला लागते. शिकण्यातील निरंतर जाणीवेने विद्यार्थी घडतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)