शिक्षक भारतीचा 15 तारखेला आंदोलनाचा इशारा
नगर – खासगी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक विभागात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्तीला लागलेले शिक्षक आता कायम झाले आहेत; परंतु अशा शिक्षकांसाठी सरकारने 24 ऑगस्ट रोजी एक नवा फतवा काढला आहे. मार्च 2019 पर्यंत हे शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत, तर त्यांना सेवेतून कमी करण्यात येणार आहे. या परिपत्रकाला शिक्षक भारतीने विरोध केला आहे. त्याविरोधात 15 तारखेपासून वेगवेगळी आंदोलने करण्याचा निर्णय सहविचार सभेत घेण्यात आला.
शिक्षक भारतीची तातडीची सहविचार सभा सुनील गाडगे यांच्या नेतृत्वाखाली झाली. कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, महिला राज्य प्रतिनिधी शकुंतला वाळुंज, जया गागरे, जिल्हा महिलाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, महानगर महिला अध्यक्ष माधवी भालेराव, जोएल थॉमस, बशीर सय्यद, दिनेश धीवर, प्रियंका मकासरे, अर्चना पंडित, जेबा तांबोळी, बेबीनंदा लांडे, जयश्री ठुबे, मंजूषा गाडेकर, माधुरी सोनार, संध्या गावडे, तृप्ती वराळ, मंजूषा शेडगे, लता पठारे, सुरेखा काळे, संगीता धराडे, सविता शितोळे, नौशाद शेख, वर्षा दरेकर, शारदा लोंढे, साधना शिंदे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रुपटक्के, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, विजय लंके, शरद धोत्रे, सुनील जाधव, जिल्हा सचिव मोहम्मद समी शेख, श्रीकांत गाडगे, ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष विलास गाडगे, सचिव महेश पाडेकर, संजय तमनर, अशोक धनवडे, जॉन सोनवणे, अशोक धनवडे, संभाजी चौधरी, संपत लबडे, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते आदी या सहविचार सभेस उपस्थित होते.
गाडगे म्हणाले, की शिक्षण विभागाने काढलेली परिपत्रके शिक्षक विरोधीच आहेत. 24 ऑगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकात 2013 पासून कायम सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी मार्चची अंतिम मुदत आहे. हे परिपत्रक तात्काळ रद्द करावे, अन्यथा शिक्षक भारती संघटना शिक्षक आमदार कपील पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. 15 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
शिक्षक भारतीच्या जिल्हा सहसचिव छाया लष्करे म्हणाल्या, की खासगी शाळेतील (अल्पसंख्याक संस्थेसह) नियुक्त शिक्षकांनी टीईटी परीक्षा 30 मार्च 2019 पर्यंत उत्तीर्ण न झाल्यास या शिक्षकांची सेवासमाप्ती करण्यात यावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील पाच हजार शिक्षकांवर सेवामुक्तीची टांगती तलवार आहे. शासनाने हा शासननिर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला आहे.
या वेळी जगताप यांनी, “जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही. सरकारला हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडू. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू,’ असा इशारा दिला. मगर यांनीही असाच इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)