शिक्षकांच्या रिक्‍त जागा भरण्याचा मार्ग मोकळा

शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून आदेश जारी

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलमार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता 6 ते 8 वी या वर्गांसाठी शिकविण्याकरिता पदवीधर शिक्षक नियुक्‍त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे 2 हजार 345 रिक्‍त पदवीधर शिक्षकांची भरती करण्यात येणार असून याबाबत शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून आदेशही जारी करण्यात आला आहे. यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शालेय शिक्षण विभागाकडून केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्‍तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 चा कायदा अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल करून पदवीधर शिक्षक नियुक्‍त करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. विज्ञान विषय सवंर्गातील गणित, विज्ञान व अभियांत्रिकी, भाषा विषय संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दु, सामाजिक शास्त्र विषय संवर्गातील इतिहास, भूगोल या प्रत्येक विषय संवर्गातील प्रत्येकी किमान 1 याप्रमाणे प्रशिक्षित पदवीधर अर्हताधारक शिक्षकांच्या नियुक्‍त्या करण्याचे निर्देश पूर्वीच देण्यात आले होते.

गेल्या 8 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची भरती झालेली नाही. प्राथमिक व पदवीधर शिक्षक या दोन्ही पदांची एकच बिंदूनामावली जिल्हा परिषदांकडे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. सद्यःस्थितीला कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांमधून जिल्हा परिषदेतील शाळांना पदवीधर शिक्षक उपलब्ध होत नाही. प्रामुख्याने गणित व विज्ञान या विषयांच्या पदवीधर शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्‍त आहेत. विज्ञान विषय संवर्गातील तब्बल 2 हजार 287 शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. ही रिक्‍त पदे भरण्यासाठी ग्राम विकास विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.

पदवीधर उमेदवारांची प्राथमिक शिक्षक संवर्गात प्रचलित नियमाप्रमाणे नियुक्‍ती देण्यात यावी, निश्‍चित केलेल्या पदसंख्येपेक्षा अधिकची पदभरती होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

पदवीधर शिक्षकांच्या रिक्‍त जागा भराव्यात यासाठी डी.टी.एड्‌., बी.एड्‌.स्टुडंट असोसिएशनचे पश्‍चिम महाराष्ट्र विभाग संघटक विठ्ठल सरगर यांच्यासह संदेश देवकाते, अरुण देवकर, राम जाधव, विपुल गागरे आदींनी शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्‍त, ग्राम विकास सचिव आदींच्या भेटी घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. सतत या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.

शिक्षक भरतीसाठी गुरुवारी जाहिरात प्रसिद्ध
पवित्र पोर्टलमार्फतच्या शिक्षक भरतीत पदवीधर शिक्षक भरतीचा समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाकडे सतत सकारात्मक बाजू मांडली. त्यामुळे या भरतीला मान्यता मिळाली आहे. आता एकूण शिक्षक भरतीची संख्या निश्‍चित वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात गुरुवारी (दि. 28) भरतीच्या एकत्रित जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी रिक्‍त पदांच्या सर्वच जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)