शिक्षकांचा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया!

– दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमावर शिक्षकांसाठी कार्यशाळा

पिंपरी – “”शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया असतो. विद्यार्थ्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी शिक्षक नेहमीच कष्ट घेतात. शिक्षकांच्या कामातील उत्साह उर्जा देतो व उर्जा कार्य सफल करते,” असे प्रतिपादन शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले.

-Ads-

जिल्हा परिषद व पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे इयत्ता दहावीच्या मराठी भाषेच्या नवीन अभ्यासक्रमा संदर्भात शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात पिंपरी-चिंचवड व मावळ येथील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णा जाधव होते. संस्थेचे संचालक विजय जाधव, पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे, प्राचार्य बाळाराम पाटील, अशोक तकटे, ज्ञानदेव दहीफळे, डॉ. सुजाता बेडेकर, संतोष काळे, नवनाथ तोत्रे,आजीनाथ गुऱ्हाळकर, जगन्नाथ देवीकर, अंजली सुमंत आदी उपस्थित होते.

शिवले म्हणाले, “”भाषिक विकासाबरोबरच विचार क्षमता, स्वमत व अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे ही मुख्य जबाबदारी मराठी भाषेचे अध्यापन करत असलेल्या शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकाच्या आधारे विविध कृती व उपक्रम राबविण्याची गरज आहे. जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भाव-भावनांचे अर्थ सौंदर्य उलगडण्यास निश्‍चितपणे मदत होते.”

अशोक तकटे म्हणाले,””शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची आहे. प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे, पारंपारिकतेकडून ज्ञानरचनावादाकडे आणि पाठांतराकडून अभिव्यक्तीकडे जाण्याची शिक्षकांना आवश्‍यकता आहे. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य, भाषाभ्यास या क्षमता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे गरजेचे आहे.”

हनुमंत कुबडे यांनी पाठ्यपुस्तकातील एकूण अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. तसेच, “”विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व आशावाद निर्माण करुन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्षमतांचा शिक्षकांनी विकास करावा,” असे त्यांनी सांगितले.

ज्ञानदेव दहीफळे यांनी गद्य आणि स्थूलवाचन याबाबत माहिती देताना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला जीवन ज्ञानाची जोड दिली पाहिजे, असे सांगत गद्यपाठाचा वाड्‌मय प्रकार स्पष्ट केला. विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक अनिल करपे यांनी सूत्रसंचालन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)