शिक्रापूर पोलिसांकडून जैन ट्रस्टची चौकशी

पाबळ येथील जैन ट्रस्टच्या विश्वस्तांचे अपहार प्रकरण :

पाबळ – येथील जैन ट्रस्टच्या विश्वस्तांवर देणगी आणि शासकीय अनुदानाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे आणि सहकारी पोलिसांच्या पथकाने पाबळ येथील जैन मंदिर, कार्यालय आणि गो पालन संस्था (पांजरपोळ) येथे नुकतीच भेट देऊन प्राथमिक चौकशी केली.

या प्रकरणातील तक्रारदार पंकज शहा (मूळ पाबळ, सध्या धनकवडी पुणे) यांनी पद्ममनी जैन तीर्थ पेढी ट्रस्टच्या संचालकांनी विश्वकल्याण जीवरक्षा प्रतिष्ठान या नावाने ट्रस्ट काढून त्या माध्यमातून फसवणूक करून शासकीय अनुदान आणि देणग्या गोळा करून अपहार केल्याची तक्रार शिरूर न्यायालयात केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिरूर न्यायालयाने ट्रस्टच्या 13 संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तत्सम गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी पंकज शहा यांचेशी संपर्क साधला असता माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रानुसार मी वेळोवेळी धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि तत्सम खात्यांमार्फत पुरावे देऊनही या प्रकरणात दखल घेतली नाही. शिवाय संबंधितांना क्‍लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात जावे लागले. तर न्यायालयाने संबंधित कागदपत्रांची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याची माहिती दिली.
तर, या प्रकरणात फिर्यादीने यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सखोल चौकशी करून या आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला असताना फिर्यादी पंकज शहा यांनी न्यायालयात हा अहवाल सादर न करता न्यायालयाची दिशाभूल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना सत्य उजेडात आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती पद्ममनी जैन श्वेतांबर तीर्थपेढीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

2002 साली पडलेल्या भीषण दुष्काळात गोरक्षण आणि जीवदया या उद्देशाने विश्वकल्याण जीवरक्षा प्रतिष्ठानच्या पद्ममनी अबोल प्राणी रक्षा केंद्रामार्फत विविध ठिकाणी जैन समाजातील नगर दौंड,बारामती, चिंचवड, लोणंद, पुणे येथील प्रतिष्ठित नागरिकांकडून श्रोगोंदा, वांबोरी, कवठे, पाबळ येथे जनावरांच्या छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यापैकी पद्ममणी जैन ट्रस्ट आणि पाबळच्या नागरिकांकडून या उपक्रमास सहकार्य करण्यात आले होते. दुष्काळानंतर पाबळच्या छावणीतील शेतकऱ्यांची जनावरे परत नेली गेली नाही. त्यामुळे संबंधित जनावरांचा सांभाळ करण्यासाठी पद्ममनी ट्रस्टला त्याचे उत्तरदायित्व घ्यावे लागले. पाबळ येथे पांजरापोळ ही संस्था सुरु राहिली. हे काम पाहूनच शासनाकडून अनुदान मिळाल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. या आरोपात तथ्य नसल्याचे आणि खोटे आरोप असल्याचे नमूद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)