शिक्रापूर-न्हावरा मार्गावर अवैध धंदे सुरूच

शिक्रापूर- शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमगाव म्हाळुंगी, घोलपवाडी, माळवाडी, पारोडी, टाकळी भीमा यांसह अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी राजरोसपणे अवैध बाटलीबंद दारू, गावठी दारू, गुटखा विक्री होत आहे. मात्र, याकडे काही पोलिसांचे आर्थिक लागेबांधे असल्यामुळे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दारू, गुटखा, वाळू अशा अवैध धंद्यांना चांगलेच पेव आले आहे. परंतु पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र अंधारात ठेवून स्वतःची पोळी भाजून घेत असल्याचेही बोलले जात आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन जवळील अनेक गावांमधील अवैध धंद्यांवर आवर बसत असताना मात्र पोलीस स्टेशनचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकी तसेच तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये पाबळ, केंदूर, धामारी, कान्हूर मेसाई, निमगाव म्हाळुंगी, घोलपवाडी, माळवाडी, पारोडी, टाकळी भीमा यांसह आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बाटलीबंद दारू, गावठी दारू तसेच गुटखा विक्री आणि वाळू वाहतूक होत आहे. याकडे पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे, असे समजत आहे. आज देखील पाबळ पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम बाटली बंद आणि गावठी दारू विक्री होत आहे.
तसेच शिक्रापूर-न्हावरा रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये खुलेआम दारूची विक्री होत आहे. तर, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीमध्ये गावठी दारूची विक्री केली जात आहे. परंतु ज्या हॉटेलांमधून दारूविक्री होत आहे. त्या हॉटेल चालकांकडून पोलिसांना हवे त्या पद्धतीने आणि पोलिसांच्या मर्जीने जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. तसेच या ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुद्धा होत आहे. परंतु गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पोलिसांना ठराविक रक्कम ठरलेली असल्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई होत नाही.
पोलिसांचे हात ओले झालेले असल्यामुळे एखाद्या हॉटेलवर कारवाई अथवा छापा टाकणार असल्यास त्या हॉटेल चालकाला कारवाईची माहिती आधीच दिली जात असते, असे बोलले जात आहे. त्यामुळे कोठेही कारवाई केल्यास दारूच्या बाटल्या आढळून येत नाहीत. जर बाटल्या आढळून आल्याच तर त्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्‍या असतात.
पाबळ आणि तळेगाव ढमढेरे पोलीस चौकी मुख्य पोलीस स्टेशन शिक्रापूरपासून काही अंतर लांब असल्यामुळे त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कारवाया कागदावर येत नसून क्वचित एखाद्या ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल केले जातात. काही ठिकाणी आर्थिक तडजोड करून कारवाया मिटविल्या जात आहेत. मात्र, तेथे कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले जात आहे.
याबाबत परिसरातील एका पोलीस कर्मचाऱ्याशी चर्चा केली असता आम्ही कारवाईसाठी जातो. त्यावेळी आम्ही आल्याचे समजताच हे दारू विक्रेते पळून जातात, असे त्या पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

 • अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
  शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व बीट अंमलदार आणि अधिकारी यांना हद्दीमध्ये कोठेही दारूविक्री होऊ देऊ नये, जर हद्दीमध्ये कोठेही दारूविक्री होताना आढळून आली तर त्या बीट अंमलदारांवर खातेनिहाय कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र दिले होते. परंतु सर्व बीट अंमलदार यांनी पोलीस निरीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असून पोलीस कर्मचारी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी पोलीस निरीक्षकांना देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
 • …म्हणून गुन्हेगारी वाढतेय
  या भागात अनेक हॉटेल व्यवसाय सुरु झाले आणि त्या ठिकाणी खुलेआम दारूविक्री, गुटखाविक्री होत असून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक या भागातून केली जात आहे. अनेक हॉटेलमध्ये दारूमुळे भांडणे देखील झाली असून दारूमुळे या भागातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. मात्र कोणावरही कारवाई होत नसल्याने या व्यावसायिकांना कोणाचे अभय मिळत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन लेखी आदेश देऊनही दारू विक्री होत असलेल्या भागांच्या बीट अंमलदारांवर तसेच माहिती लपविणाऱ्या आणि अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
  अन्यथा दारू दुकाने पेटवून देऊ – संजय पाचंगे
  शिरूर तालुका दारूबंदी आंदोलनाचे प्रणेते संजय पाचंगे यांनी सांगितले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांच्या जबाबदाऱ्या एकमेकावर ढकलण्याच्या प्रकारामुळे दारू धंदेवाल्यांचे मनोधैर्य वाढले आहे. या दोन्ही यंत्रणा यांना जाणीवपूर्वक आर्थिक हितसंबंधातून पाठीशी घालतात,.त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले सुरु झालेले आहेत. अशा प्रकारची दखल पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस निरीक्षक आणि पोलीस महासंचालकांनी घ्यावी अन्यथा, नागरिकच आता विरोध घेतल्याशिवाय राहणार नाही. पोलीस खात्याच्या नियमाप्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बीट हवालदार, पोलीस पाटील, तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.अन्यथा, 1 एप्रिलनंतर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून दारू दुकाने पेटवून देणार आहे.
 • एका पक्ष पदाधिकाऱ्याच्या हॉटेलवर दारू विक्री
  शिक्रापूर-न्हावरा रस्त्यावर दारूविक्री होत असलेल्या या भागात एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे नावाजलेले हॉटेल असून त्या हॉटेलमध्ये खुलेआम अवैध्य बाटलीबंद दारू विक्री होत आहे. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून अवैध्य दारूविक्री होत असताना त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
 • पाहणी करून छापे टाकून कारवाई करू – प्रशांत माने
  शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने यांच्याशी या भागात होत असलेल्या अवैध दारू विक्री बाबत संपर्क साधला असता ज्या ठिकाणी दारू विक्री होत आहे त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून छापे टाकून कारवाई करणार असल्याचे सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)