शिक्रापूर- चाकण चौक धोकादायक

अपघातांची मालिका वाढली : सिग्नल यंत्रणा ठरली कुचकामी

केंदूर – चाकण -शिक्रापूर रस्ता हा नेहमीच प्रवासासाठी धोक्‍याचा म्हणून ओळखला जातो. या रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याबाबत अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. मात्र, या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासी आणि नागरिकांतून होत आहे.
शिक्रापूरपासून चौफुला (पिंपळे जगताप) हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक आहे. चौफुला हा परिसर अतिशय झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे या पसिरात औद्योगिक क्षेत्रामुळे रहदारी आणि वाहतूकही वाढलेली आहे. परंतु नियोजनाचा अभाव असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही त्याचपटीत वाढले आहे. रस्त्यावरील डांबर वितळवून रस्ता ओबडधोबड झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी या चौकामध्ये शिक्रापूर पोलीस ठाणे आणि पिंपळे जगताप ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सिग्नलचे दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परंतु हे कॅमेरे कधी बंद तर कधी सुरू, अशा अवस्थेत आहेत. सिग्नलचे दिवे कधीच जमीनदोस्त झाले आहेत. शिक्रापूर ते चौफुला यादरम्यान करंदी गावच्या हद्दीत भारतगॅस फाटा हा चौक देखील अतिशय वर्दळीचा आणि गजबजलेला आहे. याच चौकात गेल्या दोन दिवसांपूर्वी गतिरोधकला पांढरा पट्टा नसल्याने ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून दुसऱ्या ट्रकवर आदळला होता. त्यातील एक ट्रक अजूनही त्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध उभा आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या चौकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखानदारी असल्याने परप्रांतीय, कामगार, ठेकेदार, आणि व्यापारी दुकानांनी परिसर गजबजलेला आहे. कधीकधी स्थानिक ठेकेदारांमध्ये या चौकात वादही होतात. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, गतिरोधक पूर्ववत करून झेब्रा क्रॉसिंग सुस्पष्ट असावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)