शिक्रापुरात वाहतूककोंडी सुटेना

शिक्रापूर– शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून,
या चौकामधील सिग्नल देखील कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांमधील बेशिस्तपणा वाढला असून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौक वाहतूककोंडीमुळे राज्यात गाजला आहे. मात्र, या ठिकाणची वाहतूककोंडी सोडविण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. पोलीस प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे बंद असलेले सिग्नल आणि रस्त्यालगत असलेले अतिक्रमण यामुळे देखील वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने
चाकण, शिक्रापूर, पुणे, नगर रस्त्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे. या ठिकाणी असलेल्या कोरेगाव भीमा आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारी वाहने, तसेच इतरही वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी हा विषय सतत चर्चेत राहिला आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमधील बेशिस्तपणा वाढला आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडून जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
येथील वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी येथील सिग्नल सुरू करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ट्रॅफिक हवालदार आणि अधिकाऱ्यांनी या चौकात थांबण्याचीही आवश्‍यकता आहे. काही वेळा वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस असतात मात्र दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी ते गायब झालेले असतात. त्यामुळे नागरिकांनाच या कोंडीतून कसरत करीत मार्ग काढावा लागत आहे.
या ठिकाणी अनेक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या कामगार वर्गाला देखील या वाहतूककोंडीचा फटका बसत असून कामाला येऊन फक्त आठ तास काम करावे लागत आहे, मात्र घरी जाण्या-येण्याच्या प्रवासात या कामगार वर्गाचे चार चार तास जात आहेत. शिरूरहून पुण्याला जाण्यासाठी पन्नास किलोमीटर अंतरासाठी नागरिकांना चक्क तीन तास प्रवास करावा लागत आहे; परंतु अनेकद मागणी करूनही शिक्रापूर पोलिसांनी येथील सिग्नल चालू करण्यासाठी पावले उचललेली नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून येथे वाहतूककोंडी होत असताना देखील येथील प्रशासन व लोकंप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून येथील चाकण चौक तसेच पुणे नगर रस्ता मोकळा करून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी येथील सिग्नल सुरु करावेत, अशी मागणी येथील नागरिक करत आहे.

  • शिक्रापूर-चाकण चौक मार्गावरूनच रुग्णवाहिका शिरूर आणि नगररस्त्याकडून येतात. मात्र, या रुग्णवाहिकांनाही या कोंडचा फटका बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत आहे. कित्येकदा रुग्णालयात वेळेत न पोहोचल्यामुळे रुग्ण देखील दगावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)