शिक्रापुरात बाजारात झाड कोसळून विक्रेत्याचा मृत्यू

शिक्रापूर- येथे भाजीपाला बाजारात सुमारे शंभर वर्षापेक्षा देखील अधिक दिवसांचे पिंपरण (नांदरुक) झाड कोसळले. यामध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (गुरूवारी) घडली. तर, यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून एका वाहनाचे नुकसान झाले आहे.
फुलसिंग कनीराम चव्हाण (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. हुंडी, ता. पुसद, जि. यवतमाळ) याचा मृत्यू झाला आहे. तर सोनाली संतोष सासवडे (वय 35), रामकृष्ण खरडकर (वय 65, दोघे रा. शिक्रापूर, ता. शिरूर) हे दोघे जखमी झाले आहे.शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्यालगत असलेल्या जुन्या पुलाजवळ खासगी जागेत दररोज भाजीपाला बाजार भरत असतो. या बाजाराजवळच शंभर वर्षापूर्वीचे दोन पिंपरण अर्थात नांदरुक नावाचे झाड आहे. या झाडांचे आयुष्य संपलेले असून खूप जुनी झालेली झाडे असल्यामुळे ती ठिसूळ झाली होती. त्यातच आज सायंकाळी चारच्या सुमारास एक मोठे झाड बाजारात कोसळले. येथील व्यापारी आणि नागरिकांची पळापळ झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक महिला आणि एक व्यक्‍ती गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या पडलेल्या झाडाखाली येथील मधुकर भुजबळ यांची (एमएच 12 एफडी 0657) पिकअप वाहनाचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, संदीप जगदाळे, राजेंद्र पवार, अमित देशमुख, महिला पोलीस नंदा घोडके, नम्रता सकट, विद्युत्र वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन महाजन, शाखा अभियंता अभिजीत बिरनाळे, शिक्रापूरचे सरपंच जयश्री भुजबळ, राम सासवडे, उत्तम गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी झाडाखाली अडकलेल्या व्यक्तींना येथील मंगेश विरोळे, सचिन करंजे, तुषार आळंदीकर, मंगेश चव्हाण, ऋषिकेश करंजे, आमीर शेख यांसह आदींच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळाने दोन क्रेनच्या मदतीने येथील झाड बाजूला करण्यात आले; परंतु यामध्ये व्यापाऱ्यांच्या भाजीपाला मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • शाळा सुटली असती तर मोठा अनर्थ घडला असता
    शिक्रापूर येथे खासगी जागेत भरल्या जाणाऱ्या बाजाराशेजारी शाळा असून या बाजारात दररोज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर नागरिक आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आज कोसळलेले झाड चारच्या सुमारास पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
  • ग्रामपंचायतीचे बाजार हटविण्यात दुर्लक्ष
    शिक्रापूर येथे दररोज भरत असलेला भाजीपाला बाजार रस्त्याचे कडेला भरत आहे. तसेच येथे शाळा असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन शालेय मुलांना देखील जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. त्यामुळे येथील बाजार हटविण्याची मागणी येथील नागरिकांनी ग्रामपंचातीकडे लेखी स्वरुपात केली होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून या घटनेमुळे एकाला जीव गमवावा लागला आहे. यानंतर तरी ग्रामपंचायत बाजार हटविण्याकडे लक्ष देईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)