शिक्रापुरात गटारीचे पाणी नदीत सोडल्याने नदीचे विद्रुपीकरण

त्या’ बांधकाम व्यवसायिकांना दिली नोटीस
शिक्रापूर येथे बांधकाम व्यावसायिकांनी नदीमध्ये सोडलेल्या गटारलाईनमुळे नदीचे विद्रुपीकरण आणि पाणी दूषित होत असल्याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आर. आर. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतच्या वतीने सर्व बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. लवकरच बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकारी आर. आर. राठोड यांनी सांगितले.

शिक्रापूर – येथे मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या इमारती बांधल्या जात असून बांधकाम व्यवसायिकांनी गटारलाईनचे पाणी वेळ नदीत सोडल्यामुळे नदीचे विद्रुपीकरण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात संबंधित प्रशासनाने चौकशी करून फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नागरीकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक बांधकाम व्यवसायिक मोठमोठ्या इमारती उभारल्या आहेत. व्यवसायिकांनी इमारती उभारताना त्यांच्या इमारतींच्या गटारलाईनची व्यवस्था केली नाही. प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने एका इमारतीत पाचशे सदनिका (फ्लॅट बांधलेले आहेत). परंतु गटारलाईनची व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या स्वरुपाची पाईपलाईन करून त्या पाईपलाईनद्वारे पाणी खुलेआम वेळ नदीत सोडून दिले आहे. व्यावसायिकांनी नदीमध्ये सोडलेल्या गटारलाईनमुळे वेळ नदीचे पाणी दूषित झाले आहे. नदीचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील नदीमध्ये बांधण्यात येत असलेल्या पाईपलाईनचे काम बंद काही नागरिकांनी पाडले असताना आम्ही लवकरच या पाईपलाईन पुढे नेण्यासाठी कार्यवाही करू असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले होते. परंतु अद्यापपर्यंत पाईपलाईन मोकळ्या अवस्थेत आहेत. त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. तर येथे नदीमध्ये पाईपलाईनद्वारे सोडण्यात आलेल्या गटारच्या पाईपलाईन काही ठिकाणी फुटल्या आहेत. त्यातून देखील मोठ्या प्रमाणात मैलामिश्रीत पाणी इतरत्र साठून राहत आहे. तर वेळ नदीत गटारचे पाणी सोडल्यामुळे त्याचा परिणाम शेजारील विहिरी तसेच स्थानिकांच्या विंधनविहिरींवर होत असल्याने नागरिकांना दुषित तसेच आरोग्याला धोका निर्माण होईल असा स्वरूपाचे पाणी वापरावे लागत आहे. तर सर्व नागरिकांना विकत पाणी घेऊन पिण्याची वेळ आली आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. येथे नदीत सोडलेल्या पाण्यामुळे शेजारील विहिरींचे पाणी देखील दूषित झालेले असल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर देखील होत आहे. तसेच नदीच्या काही अंतरावरच संपूर्ण गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीद्वारे गावाला पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. त्या विहिरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दूषित पाणी होत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. त्यामुळे येथील गटारलाईनसाठी बांधण्यात आलेल्या पाईपलाईनची चौकशी करून मोकळ्या स्वरुपात सोडण्यात आलेले पाणी बंद करून फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी देखील जितेंद्र काळोखे यांनी केली आहे.

पंचायत समितीसमोर उपोषण करणार – निलेश भुजबळ
शिक्रापूर येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचे गटारचे पाणी नदीत सोडून दिले आहे. ग्रामपंचायतला वारंवार माहिती देऊनही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गटारलाईनचे पाणी नदीत सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतने यावर तोडगा काढत असून गटारलाईन बंद केली नाहीतर पंचायत समिती शिरूरसमोर उपोषण करणार आहे, असा इशारा युवासेना अध्यक्ष निलेश भुजबळ यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)