शाहू टर्मिनसच्या 125 वर्षपूर्तीनिमित्त विशेष पोस्ट कव्हर प्रकाशित

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसने रेल्वे सेवेची 125 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते विशेष पोस्ट कव्हर प्रकाशित करण्यात आले.
यावेळी शाहू महाराज म्हणाले, उत्कृष्ठ नियोजन व अंदाजपत्रकाचे काटेकोर पालन यामुळे कामे दर्जेदार व वेळेत होवू शकतात हे राजर्षी शाहू महाराजांच्या दुरदर्शीपणातून उभारण्यात आलेल्या अनेक बाबींमधून दिसून येते. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनर्स कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे त्यापैकीच एक उत्तम उदाहरण आहे. कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा हेरिटेज ढाचा सांभाळून विकास करावा. सुक्ष्म आराखडा करुन रेल्वेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.
खासदार संभाजी राजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने असलेले कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे केवळ हेरिटेज म्हणून न राहता ते हायटेक करण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहू. या ठिकाणी दर्जेदार संग्रहालय व्हावे. 125 वर्षेपूर्तीनिमित्त दर्जेदार कॉफीटेबल बुक तयार करावे. यावेळी त्यांनी कोल्हापूर ते पुणे जलदगती रेल्वे लवकर सुरु करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 125 वर्षे जुने असलेल्या या रेल्वे स्टेशनचा मुंबईच्या सीएसटीप्रमाणे मेकओव्हर होणे आवश्‍यक आहे. लवकरच या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढणे, शेल्टरशेड, टिकीट वेंडिंग मशिन, फुट ओव्हर ब्रिज यांची कामे केली जाणार आहेत. यावेळी त्यांनी शिवाजी पुलाला पर्यायी पुल उभारण्यातील अडचण दुर झाल्याने या पुलाचे काम लवकरच मार्गी लागेल असे सांगितले.
पोस्ट विभागाचे आर. एस. पाटील यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या 125 वर्षपूर्ती निमित्त पोस्टाने विशेष पोस्टल कव्हर प्रकाशित केले असून नियमित पाकीटांपेक्षा याचे स्वरुप वेगळे असते ते एखाद्या घटनेच्या अथवा व्यक्तीच्या गौरवार्थ काढले जाते, असे त्यांनी सांगितले. देश, विदेशातील संग्रहालय अशा विशेष पोस्टर कव्हराच्या खरेदीसाठी धडपडत असतात. पुणे मंडळाचे व्यवस्थापक दादाभॉय यांनी 125 वर्षपूर्ती निमित्त प्रकाशित केलेल्या या पोस्टर कव्हरमुळे राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनची ओळख देशपातळीवर निर्माण होईल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)