शाहूपुरी पोलिसांच्या खाबुगिरीचे हुंकारे

किशोरवयातच ठाण्याची दुरावस्था; साबळे, हंकारे नंतर नंबर कुणाचा ?
प्रशांत जाधव
सातारा,  (प्रतिनिधी)

सातारा शहर व परिसरात राजरोसपणे जुगार खेळला जातो,हे वास्तव आहे.सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांनी समीर कच्छीच्या घरी छापा टाकत लाखाचा माल हस्तगत केला.या करवाईने शाहूपुरी पोलिस अन सातारा तालुका पोलिसांच्या कार्यक्षमताही उघड झाल्या. आमच्या हद्दीत तसले काहीच सुरू नाही अस सांगणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या साळसुदपणाचा बुरखा आधी साबळे मग हंकारेंच्या कृत्याने टराटरा फाटला. त्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाणे किशोरवयातच खाबुगिरीचे हुंकारे देऊ लागल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.
पोलिस उपाधीक्षक गजानन राजमाने यांनी केलेल्या कारवाईने स्थानिक पोलिस खरच निष्क्रीय आहेत की,कारवाईची गरज त्यांना भासत नाही,अशी चर्चा सुरू असतानाच हंकारेंच्या उचापतींनी या चर्चेला बळ मिळाले आहे. शाहूपुरीच्या हद्दीत सुरू असलेला मटका म्हणजे या पोलिस ठाण्याला झालेला खाबुगिरीचा आजारच आहे. या आजारामुळे जुगार, मटका बंद झाला तर पोलिस दलातील काही बहाद्दरांना दोन घास सुखाने जातील की नाही याचीच शंका आहे.सातारा शहर व परिसरात मटका चालत नाही, मटका बंद आहे, असा निर्वाळा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दिली होता. मात्र पोलिसांचाच निर्वाळा राजमाने यांच्या कारवाईने खोटा ठरल्याचे उघड झाले आहे. शहरातील विविध भागात चालणाऱ्या मटक्‍याचे मुख्यालय असणाऱ्या समीर कच्छीच्या घरावर त्यांनी छापा टाकून सारे काही उध्वस्त केले. तेथे काम करणाऱ्यांना रोख रक्कम व एक लाखाच्या साहित्यासह अटक केली. त्यामुळे शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांच्या स्वंयघोषीत कौतुकाचा फुगा फुटल्याचे बोलले जाते.
साताऱ्यात मटका काल परवा सूरू झाला अशी परस्थिती नाही. गेली कित्येक वर्षे सुरू असलेला हा धंदा नेमका कुणाच्या मदतीने सुरू होता? तो सुरू राहावा यासाठी मटकेवाल्यांनी पोलिस दलातील किती लोकांना आपलेसे केले होते. कच्छीला पोलिसांनी तडीपार करून खरे तर उपकारच केले. पण तडीपारीत तो साताऱ्याबाहेर कधी गेलाच नाही हे कुणाचे उपकार? कच्छी हा कागदपत्रावर तडीपार असला तरी प्रत्यक्षात मात्र तो पोलिसांच्या नाकावर टिच्चुन साताऱ्यात काळ्या काचा वर करून फिरत होता. हाच का आमच्या सातारा पोलिसांचा वचक ?
शहरासह जिल्ह्यात मटका सुरू आहे, मात्र तो छुप्या पद्धतीने चालतो. हे जग जाहीर असताना काही पोलिस मात्र मटकाच काय कोणताही अवैध धंदा सुरू नाही, असा निर्वाळा देण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. मात्र, त्याच पोलिसांचा निर्वाळ किती खोटा आहे, हे हंकारेंच्या व्हिडीओ मुळे समोर आले आहे. राजवाडा परिसरातील एका मटका अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या तीन पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली जो काही उद्योग केला तो पाहुन धुमाळ साहेबांना पण दु:ख झाले असेल. अत्यंत विश्‍वासातला हंकारे असा कुठे अडकला जाईल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. हंकारे काय करतात ते साहेबांना नाही म्हटले तरी माहीत असल्याची ही चर्चा आहे.
शाहूपुरी काय अन जिल्ह्यातील बाकीची ठाणी काय परस्थिती वेगळी नाही. अनेकदा कारवाईची वेळ आली की, पोलिस थेट मटका बुक्कीला कॉल करून एक माणूस दे, कारवाई दाखवायची आहे, असे म्हणत कागदोपत्री कारवाईचे नाटक करून त्याचा गाजावाजा करायचे. त्यामुळे अनेक कच्छी मोकाट राहत होते. पण पोलिस उपअधीक्षकांच्या कारवाईने अवैध व्यवसायिक हादरले आहेत. सेटलमेंट करणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईचा आग्रह धरणारांना बळ मिळाले आहे. पोलिसांची कागदोपत्री कारवाई यापुढे चालणार नाही असे वाटत असतानाच “” कितीही आले, गेले तरी मटका सुरूच राहणार”” या हंकारेंच्या भाकीतामुळे गजानन राजमाने यांच्यापुढे घरभेद्यांना ताळ्यावर आणत कारवाईचे मोठे आव्हन निर्माण झाले आहे.
——————————————————-
पोलिस दलातील कलेक्‍टरची चर्चा
मटका अड्ड्यावर कारवाइचे नाटक करत पैसे उकळल्याच्या व्हिडीओमुळे हंकारे चर्चेत आला आहे. हंकारे हा शाहूपुरीच्या वरिष्ठांच्या मागे पुढे फिरणाऱ्या पैकी एक आहे. तसेच तो पोलिस दलात कलेक्‍टर या नावाने परिचयाचा आहे. त्यामुळे पोलिस दलातील कलेक्‍टरची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
3 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)