शाहूपुरीवासियांना आणखी दोन महिने त्रास

गुरूनाथ जाधव
सातारा – सातारा शहरातील शाहूपुरी परिसरात गजानन महाराज मंदिर रस्त्याचे काम पुर्ण होण्यास किमान 2 महिने लागणार आहेत. त्यामुळे येथील अंजली कॉलनी, सुयोग कॉलनी, अर्कशाळा नगरच्या नागरिकांना वाहतुकीसाठीचा होणारा त्रास सोसावा लागणार आहे.

कोटेश्‍वर मंदिर ते शाहुपूरी अर्कशाळेसमोरील पुलावरील बांधकामामुळे अनेक दिवस शाहुपूरीवासियांची वहातुक व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे पर्यायी असलेल्या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या स्वरूपात ताण आला. शाहुपूरी व परिसरातील नागरिकांची दैनंदिन वर्दळ या रस्त्यावर होत असल्याने या रस्त्याची चाळण झाली. धुळीने येथील नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होत आहे. या रस्ते बांधणीच्या कामासाठी सुमारे 10 लाख रूपयाचा निधी मंजुर झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व प्रकारच्या टेंडर प्रक्रिया देखील पुर्ण झाल्या असून मुख्यत्वेकरून भुयारी गटर योजनेचे काम जोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरूवात करता येत नसल्याची माहिती नगरपरिषदेच्या विभागाने दिली आहे. यामध्ये नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र नागरिकांच्या हितासाठी त्यांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. सातारा नगरपरिषदेच्यावतीने गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी चेंबर काढणे, पाईप टाकणे याप्रकारच्या भुयारी गटर योजनेचे काम युध्द पातळीवर सध्या सुरू आहे.

सातारा नगरपरिषदेच्यावतीने सातारा शहरात तीन टप्यात भुयारी गटर योजनेचे काम सुरू केले आहे. त्यातील पहिल्या टप्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये शहरातील पश्‍चिम भागातील भुयारी गटरांचे काम सुरू केले आहे. या सर्व सांडपाण्याचे नियोजन जरंडेश्‍वर नाका शेजारील बेगर्स होम येथील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत पोहचवले जाणार आहे. यामुळे 75 टक्के ओढ्यांमधुन जाणारे पाणी भुयारी गटर योजनेच्या माध्यमातुन एसटीपी प्लॅटपर्यंत पोहचणार आहे.

वेण्णा आणि कृष्णा नदीमध्ये होणाऱ्या प्रदुषणाबाबत विधायक प्रकल्प सातारा नगरपरिषदेच्यावतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटर योजनेच्या माध्यमातून शहर परिसरातील नागरिकांची भुयारी गटर योजना जोडणी सुरू आहे. हे काम युध्दपातळीवर टप्प्या टप्यामध्ये सुरू आहे. गजानन महाराज मंदिर रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने देखील पाणी गळतीचे काम सुरू असल्याने रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. यामुळे देखील वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे.

मुख्य म्हणजे आता जेसीबीद्वारे रस्ता खुदाई करून भुयारी गटर योजनेचे काम सुरू असल्याने दुचाकी व चार चाकी वाहनांची वाहतुक पुर्णत: बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोटेश्‍वर मंदिर, अर्कशाळा रस्त्यावरून नागरिकांनीच वाहतुक पुन्हा सुरू केली आहे. येथील रस्त्यावर खडीकरण केले आहे. स्लॅबचे काम देखील पुर्ण झाले आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावर डांबरीकरण होईपर्यंत रस्ता बंद करणे आवश्‍यक आहे. परंतु शाहुपूरीकरांना आता कोणत्याही परिस्थितीत थांबणे अवघड झाले असल्याने नागरिकांनी आहे तश्‍याच पध्दतीने वाहतुक सुरू केली असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)