शाहिरी व कीर्तन हा अभिनयाचा मूळ स्त्रोत – योगेश सोमण

पुणे  – शाहिरी व कीर्तन ही अभिनयाची मूळ परंपरा आहे. शाहिरीचा बाज हा वाचिक अभिनयासाठी उत्तम आहे. लयबद्ध संवाद कसे बोलावे, हे आपण शाहिरी व कीर्तनासारख्या कलांमधून शिकतो. अगदी व्या शतकापासून संतपरंपरेसोबतच समाजातील काळोख शाहिरीच्या माध्यमातून दूर करीत मनगटात वीरश्री निर्माण करण्याचे काम शाहिरांनी केले आहे. त्यामुळे अभिनयाचा मूळ स्त्रोत असलेल्या शाहिरी व कीर्तन परंपरेला प्रोत्साहन द्यायला हवे, असे मत नाटय दिग्दर्शक. अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे युवा शाहीर कल्याण काळे यांना शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी सोमण बोलत होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते.
मेघराज राजेभोसले म्हणाले, समाज व पिढी घडविण्याचे काम शाहिरीतून होत असते. सध्या इलेक्‍ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या युगामध्ये शाहिरीसारख्या कला मुलांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. ऑनलाईन गेम्स हे आजच्या पिढीकरीता धोकादायक असून आजच्या पिढीला शाहिरीसारख्या पारंपरिक कलांमध्ये गुंतवून समाजशिक्षण द्यायला हवे. शाहिरांनी केवळ ऐतिहासिक नाही, तर समाजातील सद्य परिस्थितीतील प्रश्नांवर प्रकाश टाकून प्रबोधन करायला हवे.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, कोणत्याही कलेमध्ये व्यावसायिकता असली, तरी कलाकाराने ती कला व्रत म्हणून देखील जगायला हवी. त्या कलेतील सरस्वतीची पूजा कलाकाराला करता आली पाहिजे. प्रबोधिनीच्या माध्यमातून शाहिरीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जोपर्यंत सामाजिक प्रश्न आहेत, तोपर्यंत शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन सुरु राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुरस्कार वितरण समारंभानंतर शाहीर कल्याण काळे यांचा नमन तुज शाहीरा हा कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)