शास्ती माफीचे विरोधक करणार “काउंट डाऊन’

पिंपरी – चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 9) अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसात माफ करु, असे आश्‍वासन दिले आहे. यापूर्वीही अनेकदा आश्‍वासने देवून शास्ती माफी झाली नाही. त्यावरुन भाजपची कोंडी करण्यासाठी महापालिकेतील विरोधक एकवटले आहेत. शास्ती कर माफीच्या निर्णयाच्या आश्‍वासनाचा फलक लावून “काउंट डाऊन’ केले जाणार आहे. उद्यापासून (शनिवार) “काउंट डाऊन’ सुरु होणार आहे.

याबाबत विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी (दि. 11) महापालिका भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले की, यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथील त्यांच्याच एका सभेत शास्तीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या-त्या महापालिकांना देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, अद्याप काहीही झाले नाही. असे असताना मुख्यमंत्र्यांनी शास्तीबद्‌द्‌ल बोलत असताना येत्या 15 दिवसात मंत्रीमंडळांची बैठक घेत शास्तीची धास्ती दूर करू असे पुन्हा आश्‍वासन दिले आहे. अशा आश्‍वासनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे.

मुख्यमंत्री वारंवार आश्‍वासने देतात. मात्र, त्याची पूर्तता होत नाही. त्यांनाच त्यांच्या आश्‍वासनांचा विसर पडत आहे. आजही अनेकांना जप्ती पूर्वीच्या नोटीसा येत आहेत. त्यामुळे नागरिक आजही भीतीच्या वातावरणात दिवस ढकलत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेल्या आश्‍वासनांचा त्यांना व नागरिकांना विसर पडू नये यासाठी हे फलक लावले जाणार आहेत. तसेच 16 व्या दिवशी आश्‍वासन पूर्ण झाले नाही तर आंबेडकर चौकात मुख्यमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा चिखले यांनी दिला.

मुख्यमंत्री हे केवळ आश्‍वासनाने देतात. त्यांची अमंलबजावणी ही शहरात कधी झालेली दिसली नाही मग ते शास्ती कर असो की, पवना बंद जलवाहिनी. ते केवळ मोठ-मोठी आश्‍वासने देतात. त्यामुळे यावेळी त्यांनी शब्द पाळला तर ते यापुढे जेव्हा शहरात येतील तेव्हा त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असा टोला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी लगावला.

…तोपर्यंत जप्तीच्या नोटीस थांबवा
मुख्यमंत्री जाहीररित्या शास्तीकर माफीचे आश्‍वासन दिले आहे. असे असताना महापालिका प्रशासन मात्र आजही नागरिकांना जप्तीपूर्वीच्या नोटीसा पाठवत आहेत. त्यामुळे किमान पंधरा दिवस जोपर्यंत मंत्रीमंडळाचा आदेश येत नाही तोपर्यंत या नोटीस थांबवाव्यात. चोविस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जे नळजोड अनधिकृत म्हणून तोडले जात आहेत त्यांच्यावरील कारवाई थांबवावी. मंत्रीमंडळाचा निर्णय आल्यानंतरच योग्य ती कारवाई करावी. मुख्यमंत्री शहरात घोषणा करतात आणि प्रशासन मात्र कारवाई करते. यामुळे नागरिकही संभ्रमात आहेत. त्यामुळे ही कारवाई पुढील पंधरा दिवस थांबवावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)