“शास्ती’तून आता “मुक्‍ती’चे संकेत!

  • महापालिका आयुक्‍तांच्या भूमिकेकडे लक्ष : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने दिलासा

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी “शास्तीकर’च्या ओझ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे माडले आहे. परिणामी, कर संकलन विभागाला मिळकतकर वसुलीमध्ये अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडकरांना “शास्ती’तून “मुक्‍ती’ मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महापालिकेच्या वतीने सध्या थकीत शास्तीकरासह मिळकतकर जमा करून घेतला जात आहे. त्यातच पंधरा दिवसांत शास्तीकरासह मूळ मिळकतकर भरावा, अशा नोटिसा नागरिकांना दिल्याने मिळकतदार वैतागले आहेत. यामुळे नागरिकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. महापालिकेच्या करसंकलन कार्यालयाच्या वतीने शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारला जात नसल्याने थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत. शासन दरबारी शास्तीकराबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरून घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या शास्तीसह मिळकत कर वुसलीच्या निर्णयाविरोधात “एटीएस’ टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर ए. एस. ओका आणि रियाझ छागला यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायपीठाने असे म्हटले आहे की, महाराष्ट्र नगर निगम अधिनियम 1949 च्या कलम 267 अ नुसार व्याजासहित दंडाची रक्कम वगळता याचिकाकर्त्याने जमा केलेले मालमत्ता कर जमा केले जावे. दि.31 मार्च पूर्वी दंड (शास्ती) वगळून मूळ मिळकत कर भरण्याची सूचना याचिकाकर्त्यास केली आहे. तसेच, प्रतिवादी महापालिका प्रशासनाला याबाबत 19 एप्रिल, 2018 रोजी बाजू मांडण्याच्या ची संधी दिली असून, याचिकाकर्त्याला दिलासा दिला आहे. त्यामुळे शहरातील मिळकत धारकांना शास्ती वगळून मूळ मिळकत कर भरण्याची मुभा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेनेचे आयुक्‍तांना निवेदन…
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, शहरातील मिळकत धारकांकडून दंडाची रक्‍कम (शास्ती) मूळ मिळकतकर भरुन घ्यावा. मिळकत कर भरण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मिळकत कर भरावा, यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेवून शास्ती अथवा दंडविरहीत मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. याबाबत कायदेशीर बाजुंची पडताळणी करुन निर्णय घेण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्याचे आयुक्‍त हर्डीकर यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)