शासनाच्या निषेधार्थ मुंडन, जामखेडमध्ये बैलगाडी मोर्चा

जवळा (जामखेड) - येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला.

जामखेड – जामखेड तालुक्‍यातील खर्डा, अरणगाव, जवळा या ठिकाणी कडकडीत बंद पाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जामखेड शहरातून बैलगाडीसह फेरी काढून खर्डा चौकात तब्बल आठ तास चक्काजाम आंदोलन केले.सायंकाळी पाच वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी विविध संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता.

शहरातील खर्डा चौकात सकाळी 9 वाजता आंदोलनाच्या निमित्ताने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमा झाले. यानंतर सकाळी बैलगाड्यासह जामखेड शहरातील नगररोड, बीडरोड, मेनरोड व खर्डा चौकातुन फेरी काढण्यात आली. ही फेरी खर्डा चौकात आल्यानंतर लहान मुलींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चक्काजाम आंदोलनास राष्ट्रगीताने सुरवात झाली. आंदोलनात मुली व महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी हुतात्मा झालेल्या

-Ads-

समाज बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर मुलींनी आपल्या संतप्त भावना व्यक्‍त करताना म्हणाल्या की मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण मिळावे, ऍट्रासिटी कायद्यात बदल करावा,शिक्षणात व नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली तसेच सरकार अरक्षणाच्या विषयावर टाळाटाळ करीत असल्याने आंदोलनकर्त्यांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडुन टीका केली. दुपारनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतांचा व भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळपासुनच जामखेड तालुक्‍यासह शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चक्काजाम आंदोलनामुळे एकही वाहन रस्त्यावर दिसले नाही. तालुक्‍यातील बससेवा पूर्णपणे ठप्प असल्याने बसस्थानक आणि रस्त्यांवर ही वाहने नसल्याने शुकशुकाट जाणवत होता. रस्त्यावर वाहने नसल्याने पेट्रोलपंप ही ओस पडले होते. शाळा, महाविद्यालय ही बंद ठेवण्यात आले होते. खर्डा येथे शिर्डी – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करुन खर्डा गाव पूर्ण बंद ठेवण्यात आले होते. यावेळी या आंदोलनात तालुक्‍यातील तरुण, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले होते. तालुक्‍यातील जवळा येथे दोनशे आंदोलनकर्त्यांनी मुंडण करुन आंदोलन केले.

हळगाव व अरणगाव या ठिकाणी देखील गाव बंद ठेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या आंदोलनास चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांच्यासह धनगर समाजाने पाठिंबा दिला.तसेच कोल्हाटी समाज, मेडिकल संटघना, डॉक्‍टर संघटना व जामखेड वकील संघाने आपले एक दिवसाचे कामकाज ठेऊन पाठींबा दिला.
या आंदोलनात माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, शरद कार्ले, सोमनाथ तनपुरे, युवराज पोकळे, तात्याराम पोकळे, राम निकम, संतोष पवार, गुलाब जांभळे, नगरसेवक डीगंबंर चव्हाण, पवन राळेभात, संजय काशिद, सुनिल जगताप, प्रदीप टापरे, कुंडल राळेभात, संजय वराट, महादेव डुचे, पांडुराजे भोसले, नितीन राळेभात, सोमनाथ पोकळे, दिपक महाराज गायकवाड, अरुण जाधवसह सकल मराठासह सर्वच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन मिनिटांत रुग्णावाहिकेला वाट

खर्डा चौकातील आंदोलनात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. जागेवरच आंदोलनकर्त्यांची अल्पोपाहाराची सोय केली होती. यावेळी रुग्णांना घेऊन दोन वेळा 108 ही रुग्णावाहिनी खर्डा चौकात आली. यावेळी आंदोलक मराठा बांधवांनी संयम राखत दोन मिनिटांत वाट करुन दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)