जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांनी शिवछत्रपती महाविद्यालयास बजावली नोटीस
जुन्नर- जुन्नर शहरात असणाऱ्या श्री शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयास खासगी शिकवणीच्या प्रकरणावरून जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी नोटीस बजावली आहे. तर याबाबत शिक्षण उपसंचालकांना कळविण्यात आले असून पुढील आदेश आल्यानंतर योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कोटा क्लास प्रकरणामुळे महाविद्यालयाची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.
शासनमान्य संस्थेमध्येच अनुदानित शिक्षक खासगी शिकवणी घेतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. बाहेरील खासगी यंत्रणेद्वारे विद्यार्थ्यांचे खासगी शिकवणीचे वर्ग घेऊन भरमसाठ फी घेऊन विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्याचा हा प्रकार असून याबाबत याबाबत शिक्षण उपसंचालक यांना कळविले आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
– के. डी. भुजबळ, गटशिक्षणाधिकारी
याबाबत माहिती अशी की, श्री शिवछत्रपती महाविद्यालय व राजस्थान, कोटा येथील मोशन अकॅडमी यांच्याकडून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेतील काही विद्यार्थ्यांसाठी खासगी शिकवणीच्या स्वरूपातील क्लास सुरू आहेत. या क्लाससाठी विद्यार्थ्यांकडून प्रति वर्षी आकारण्यात येणाऱ्या फीची रक्कम मोठी असल्याने याबाबत शिक्षण आयुक्तांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच प्रसार माध्यमांमध्ये देखील याबाबत जोरदार आवाज उठविण्यात आला होता.
याची दखल घेऊन जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांनी महाविद्यालयास भेट देऊन चौकशी केली असता त्यांना काही गंभीर बाबी आढळून आल्या. त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात संबंधित खासगी सुरू असलेल्या क्लासला देखील भेट दिली व विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. या क्लाससाठी पालकांनी मोठ्या रक्कमेची फी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
याबाबत त्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. महाविद्यालयास दिलेल्या नोटीसीमध्ये म्हंटले आहे की, दहावी परीक्षा दिलेले ज्यांचा कॉलेजशी काहीही संबंध नाही त्यांची फी अकरावीच्या प्रवेशावेळी घेणार, अकरावी पास होऊन बारावीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये, तसेच मोशन अकॅडमी व कॉलेजच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या क्लाससाठी अकरावीसाठी 80 हजार तर बारावीत असताना ऐंशी हजार रुपये अशी एकूण एक लाख साठ हजार रुपये फी मुलांकडून वसूल केलेली आहे. यासाठी महाविद्यालयातील एक डी तुकडी राखून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.
या सर्व बाबी बेकायदा कॉलेजमध्ये सुरू केल्या असून शासनमान्य अनुदानित कॉलेजमध्ये चालणारा हा प्रकार गंभीर आहे. याबाबत महाविद्यालयाने ज्युनिअर विभाग फी विवरण, कॅशबुक, मोशन अकॅडमी कोटा यांच्याशी केलेला करार प्रत, पिटीए इतिवृत्त, शाळा समिती इतिवृत्त, कार्यकारी समिती इतिवृत्त, कार्यकारी समिती इतिवृत्त, विद्यार्थी हजेरी पत्रक, फी संकलन रजिस्टर, बॅंक भरणा स्लिपा, बॅंक पासबुक, शिक्षक पगार रजिस्टर आदी कागदपत्रे तसेच प्रा. एस. डी. सूर्यवंशी यांच्यासह अन्य पाच प्राध्यापकांची वैयक्तिक मान्यता प्रति 27 एप्रिल रोजी सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांनी महाविद्यालयास दिला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा