ओतूर परिसरात लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण
ओतूर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओतुर परिसरात 38 मतदान केंद्रावर मतदान सुरुळीत होण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, या संदर्भात सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ओतूर विभागाचे मंडलअधिकारी डी. एस. लवांडे यांनी दिली.
दुसऱ्या बाजूला प्रचाराच्या तोफा थंडावल्या असू, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची धामधुम आता शांत झाली आहे. सोमवारी (दि. 29) शिरूर लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने शासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जुन्नर तालुक्यात पोलिसांची कुमक वाढविण्यात आली असून, आचारसंहितेचा भंग होऊ नये, तसेच मतदारांना निर्भयतेने मतदान करता यावे यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बंदोबस्त वाढविला आहे. स्थानिक पोलीस बंदोबस्तासह दुसऱ्या विभागाकडून एसआरपीएफ जवानांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत, तर निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून ठिकठिकाणी संचलन करण्यात आले आहे.
ओतूर विभागात एकुण 38 मतदान केंद्र येत असून या प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक शिपाई अशी यंत्रणा कार्यरत असणार आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान सुरळीत होईल याची काळजी घेण्यात आली आहे, तसेच मतदान केंद्रावर येणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधींना, केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या राहण्यापासून जेवण-पाणी, लाईट व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आली आहे.ओतूर विभागातील ओतूर, अहिनवेवाडी, ठिकेकरवाडी, धोलवड, डुंबरवाडी, कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे, मांदारणे, उंब्रज, हिवरे खुर्द, खामुंडी, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघरवाडी, चिल्हेवाडी आणि वाड्या-वस्त्यांवरील मतदान केंद्रांवर मतदान व्यवस्था करण्यात आली असल्याचे ओतूरचे मंडलअधिकारी डी. एस. लवांडे यांनी सांगितले. रविवारी संबंधितांना मतदान साहित्य वाटप करून, सुचना देऊन मतदान केंद्रावर पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.