शासकीय इमारती कोलमडतात कशा?

राहाता – शासकीय योजनेतून बांधलेल्या इमारती का कोलमडतात याचा विचार होणे गरजेचे आहे. प्रबोधन करणारी तरुण पिढी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणखी प्रभावी करण्याची आवश्‍यकता असल्याची अपेक्षा जि.प. अध्यक्षा शालिनी विखे यांनी व्यक्त केली.

लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नगर विभागातील कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे उद्‌घाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले; यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. हरिभाऊ आहेर, प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्या लीलावती सरोदे, आदी उपस्थित होते. प्रारंभी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री दुबे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून परिसरात ग्रामस्थ आणि महिलांसाठी वर्षभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवीत असल्याचे प्रास्ताविक भाषणात सांगितले.

विखे म्हणाल्या, “”अजूनही शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत नसल्याने अनेकांना लाभापासून वंचित रहावे लागते. समाजापर्यंत या योजना जाण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी योजनेचे काम केवळ शिबिरापुरते मर्यादित न ठेवता केलेल्या कामात सातत्य ठेवावे. व्याप्ती वाढवली तर त्याचा चांगला उपयोग होईल, असे सांगताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रबोधन करणारी तरुण पिढी निर्माण झाली तर भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसेल.

ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू इतक्‍या वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत. आपल्याकडे मात्र 15-20 वर्षांतील इमारती कोसळून चिमुकल्यांचे जीव गमवावे लागतात ही मोठी शोकांतिका असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांतील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश भान यांनी, तर आभार महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रूपाली नवले यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)