शासकीय इमारतींच्या सद्यस्थितीचा तातडीने आढावा घ्या; आशुतोष काळे यांच्या सूचना 

कोपरगाव, (प्रतिनिधी)- निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेतील काही विद्यार्थी मृत्यूशी झुंज देत आहे, तर काही विद्यार्थ्यांना अपंगत्व आले आहे. अशा घटनांची कोपरगाव तालुक्‍यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कोपरगाव तालुक्‍यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व इमारतींचा आढावा घेवून एकत्रित अहवाल सादर करावा, अशा सूचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यानी पंचायत समितीला दिल्या आहेत.

कोपरगाव तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येक गावात शासकीय इमारती आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या खोल्या, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना, सरकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व इमारती, आदी शासकीय इमारतींची पाहणी करून या सर्व इमारतींचा एकत्रित अहवाल सादर करावा.

यामध्ये पत्येक शासकीय इमारतीचे बांधकाम कधी झाले आहे. या इमारतींपैकी धोकादायक इमारती किती आहेत. यापूर्वी या इमारतीच्या दुरुस्ती अथवा नुतनीकरणासाठी आजपर्यंत काय पाठपुरावा केला आहे. धोकादायक इमारतींमध्ये आजही सरकारी कामकाज सुरू आहे का आदी बाबींची माहिती घेवून या माहितीचा एकत्रितपणे अहवाल सादर करण्याच्या सूचना युवा नेते आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन व गटविकास अधिकारी वाघिरे यांना केल्या आहेत. सदरचा एकत्रित अहवाल प्राप्त झाल्यानंतर या सर्व इमारतींच्या दुरुस्ती अथवा नुतनीकरणासाठी जिल्हा परिषदेकडे तातडीने प्रयत्न करणार असल्याचे आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)