शासकीय अधिकाऱ्यांची दिवाळी सुरूच

फलटणमधील कार्यालयांत कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य; नागरिकांची गर्दी

फलटण – दीपावलीच्या सलग सुट्ट्या उपभोगूनही शासकीय अधिकाऱ्यांची दिवाळी अजूनही संपलेली दिसत नाही. अनेक अधिकारी व कर्मचारी कामावर रुजू न झाल्यामुळे कामे खोळंबून पडली आहेत तर नागरिकांची कार्यालयामध्ये गर्दी वाढू लागली आहे.

दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे सरकारी बंद राहिल्यामुळे नागरिकांची शासन दरबारी अनेक कामे खोळंबली होती. सुट्ट्या संपल्यानंतर अनेकजण शासकीय कार्यालयात आले, मात्र, त्यांची निराशा झाली. फलटणचे प्रांताधिकारी बैठकीला साताऱ्यात तर अव्वल कारकून रजेवर, तहसिलदार हजर तर निम्म्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी गैरहजर अशी अवस्था फलटणमधील सरकारी कार्यालयांमध्ये दिसून येत आहे.

भूमि अभिलेखच्या साहेबांची अद्याप दिवाळी सुरूच तर मुख्याधिकारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी हजर अशी परिस्थिती सरकारी कार्यालयातील होती. सलग सुट्ट्यांमुळे आठवडभर बंद असलेली सरकारी कार्यालये आज सुरू झालेली असली तरी काही कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची सुट्टी अद्यापही सुरुच असल्याचे चित्र आज फलटणमध्ये दिसले.
फलटण तालुक्‍याची महत्त्वाची सरकारी कार्यालये ही एकत्रितरित्या सिटी बिल्डिंग या संस्थानकालीन इमारतीमध्ये सुरु आहेत.

प्रांत कार्यालयात प्रांत सातारा येथे मिटींगला गेल्याचे सांगण्यात आले. तर अव्वल कारकून रजेवर असल्याने उर्वरित चार लोकांवर सुरू असलेल्या प्रांत कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता. कोणताही ठोस निर्णय अथवा सहीचे धनी नसल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त होत होता. तहसील कार्यालयात तहसिलदार जातीने हजर होते. परंतु, निम्म्याच्यावर अधिकारी, कर्मचारी गायब होते. भूमिअभिलेख कार्यालयात तर आबादीअबाद होती.

साहेबांसह बरेच कर्मचारी गायब होते. एक कंत्राटी कर्मचारी संपूर्णपणे कार्यालय चालवत होता. जि. प. बांधकाम विभागात व लघू पाटबंधारे विभागाचा कारभार साहेबांच्या उपस्थित सुरू होता. फलटण नगरपरिषदेच्या नूतन मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. आठ दिवसांच्या सुट्टीनंतर फलटणकर नागरिकांनीसुद्धा नगरपरिषदेत मोठी गर्दी केलेली दिसत होती. पंचायत समितीमध्ये प्रभारी गटविकास अधिकारी यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती चांगली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)