शाळेमध्ये मुलामुलींचे वर्ग वेगळे करण्याची गरज

शिक्रापुरातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब केवटे यांचे मत
शिक्रापूर -सध्या राज्यभर सर्वत्र मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असून मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी व शालेय मुलांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी शाळेमध्ये मुलामुलींचे वर्ग वेगळे करण्याची गरज असल्याचे मत शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब नारायण केवटे यांनी व्यक्त केले.
सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढत असून यामागे शालेय जीवन, मोबाईल, इंटरनेट तसेच सिनेमे कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. शाळा व महाविद्यालय या ठिकाणी मुले व मुली हे सुट्टीच्या वेळेमध्ये वेगळ्याच भावनेने वावरत असतात. त्यामध्ये अलीकडील काळामध्ये मुलांकडे आलेले पैसे आणि वाहने तसेच मुलींना मिळालेले मोबाईल कारणीभूत ठरत आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालय या ठिकाणी काही मुलामुलींचे प्रेमसंबंध असल्याचे उघड उघड दिसून येत आहे. तसेच शाळेमध्ये एका वर्गात शिकत असताना एखाद्या मुलीने अगर मुलाने एखाद्या मुला-मुलीकडे पाहिले तर शेजारील मुलांचे देखील लक्ष विचलित होत असल्यामुळे एकामुळे अनेकांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. अनेकदा शाळा, महाविद्यालय तसेच कॉलेजमध्ये मुले मोबाईलमध्ये सिनेमे पाहणे, गाणी ऐकणे, गेम खेळणे, इंटरनेट चालविणे यामध्ये दंग झालेली असतात. तसेच मुलामुलींचे वर्ग एकाच वेळी भरत असल्यामुळे काही मुलामुलींचे गुपचूप फिरणे सुरु होऊ लागलेले आहे. तसेच काही ठिकाणी काही मुले मुली हे शाळा व कॉलेजच्या वेळेमध्ये शाळा कॉलेज बुडवून कोठेतरी फिरायला जाऊन सुट्टीच्या वेळेस घरी जाण्याचे प्रकार देखील ग्रामीण भागामध्ये वाढत चाललेले दिसून येत आहेत; परंतु मुलामुलींचे वर्ग हे वेगवेगळ्या वेळेत सकाळ, दुपार अशा दोन सत्रांमध्ये भरल्यास हे प्रकार निश्‍चितच थांबले जातील आणि वर्गामध्ये अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष हे देखील होणार नाहीत. असे देखील यावेळी भाऊसाहेब नारायण केवटे यांनी सांगितले.
सध्या ग्रामीण भागातील युवक सैराट झाला असून त्यामुळे अनेक गैरप्रकार घडत आहेत. अनेक शालेय मुलींकडे सध्या मोबाईल असून कित्येक मुलींच्या पालकांना आपल्या मुलीकडे मोबाईल असल्याची कल्पना देखील नाही. पूर्वीच्या शालेय जीवनामध्ये आणि आत्ताच्या शालेय जीवनामध्ये मोठा फरक झाला असून मुले आणि शिक्षक यांच्यामध्ये गुरु शिष्याचे वातावरण लोप पावत आहेत. काही ठिकाणी शिक्षकांनी मुलांना ओरडल्यास अथवा शिक्षा केल्यास पालकांकडून शिक्षकांना धारेवर धरले जात आहे. त्यामुळे पालकांकडून त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे देखील चित्र दिसून येत आहे. त्यामुळे समाजामध्ये मुलामुलींमध्ये समाधानाचे वातावरण तयार करायचे असल्यास पालकांनी शालेय मुलामुलींना मोबाईल, इंटरनेट, दुचाक्‍या यांपासून दूर ठेवून त्यांच्यावर करडी नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच मुलामुलींचे वर्ग हे वेगवेगळ्या वेळेत तसेच वेगवेगळे भरणे गरजेचे असून शासनाने याबाबत पावले उचलणे महत्वाचे असल्याची गरज निर्माण झाली आहे.
मुलामुलींचे वर्ग वेगळे भरू शकतात
प्रत्येक शाळेमध्ये मुलामुलींची संख्या समांतर असून तेथे प्रत्येक वर्गामध्ये निम्मी मुले तर निम्म्या मुली असा वर्ग भरविला जातो; परंतु यामध्ये यातील प्रत्येक वर्गामध्ये मुली एकत्र व मुले एकत्र अशापद्धतीने वर्ग भरविल्यास वर्गामध्ये फक्त मुले अथवा फक्त मुली बसल्यास सर्वांचे लक्ष शिक्षणाकडे लागले जाईल त्यामुळे सोप्या पद्धतीने रचना केल्यास शाळेमध्ये मुलामुलींचे वर्ग हे सहजपणे वेगळे भरू शकतात. त्यासाठी विशिष्ठ अशी कोणती पद्धत राबविण्याची गरज देखील भासणार नाही.
मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार
मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शालेय वेळांमध्ये बदल तसेच मुलामुलींचे वर्ग वेगळे करण्याची गरज असून मुलामुलींचे वर्ग वेगळे भरविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांच्याशी देखील पत्रव्यवहार करणार असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब नारायण केवटे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)