शाळेच्या हस्तांतरणासाठी उधळपट्टी?

– राहुल कलाटे : “ती’ जागा नाममात्र भाड्याने घ्या!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील चिंचवडच्या पेठ क्रमांक 30 मधील प्राथमिक शाळा क्रमांक एकची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तब्बल प्राधिकरणाला 6 कोटी 17 लाख 53 हजार रुपये मोजण्याचा धक्‍कादायक निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. परंतु, शाळेची जागा नाममात्र दराने भाड्याने घेवून ती विकसित करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चिंचवड पेठ क्रमांक 30, प्राथमिक शाळा क्रमांक 1 पिंपरी- चिंचवड महापालिकेस हस्तांतरित करण्याचा विषय क्रमांक 12 मंजूर करण्यात आलेला आहे. याविषयी कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले असून याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

कलाटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, चिंचवड गावातील शाळा महापालिकेने पालक व विद्यार्थ्यांचा विरोध असताना पोलीस आयुक्तालयास दिली, तेथील विद्यार्थी नव्याने बांधण्यात आलेल्या दळवीनगरच्या शाळेत स्थलांतरित केले. तेथून जवळच असणाऱ्या शाळेची जागा प्राधिकरणातून महापालिका विकत घेत आहेत. त्यासाठी प्राधिकरणाला महापालिकेकडून तब्बल 6 कोटी 17 लाख 53 हजार रुपये जागेच्या मोबदल्यात देण्याचा विषय स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना कसलीही माहिती नाही. वास्तविक महापालिका आयुक्त स्थायी समिती बैठकीला उपस्थित नसताना चर्चा न करता एवढा महत्त्वाचा विषय कसा काय मंजूर केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच महापालिका “ऍमिनिटी’ व “ओपन स्पेस’ प्राधिकरणाकडून नाममात्र दराने विकसित करण्यासाठी घेत आहोत. शाळा ही देखील एक “ऍमिनिटी’ असल्याकारणाने ही जागा पण आपण नाममात्र दराने घ्यावी, असे कलाटे यांनी म्हटले आहे.

कलाटे यांनी उपस्थित केले प्रश्‍न
महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. म्हणून कोट्यावधी रुपयांचे भूखंड घेणे योग्य आहे का? किंबहुना, हा खटाटोप केवळ मिळालेल्या भूखंडावर इमारत बांधून ठेकेदार पोसण्यासाठी तर नाही ना! ही शंका निर्माण होत आहे. याच पद्धतीने कामकाज चालू राहिल्यास भविष्यात नागरिकांना पश्‍चाताप सहन करावा लागेल, त्यामुळे या प्रकरणी आपण लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, असेही शिवसेना गटनेता राहुल कलाटे यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)