संग्रहित फोटो

बदली गेलेल्यांच्या जागी शिक्षकांची नेमणूक नाही : प्रशासनाच्या भोंगळा कारभार

पुणे – शिक्षकांच्या बदल्या होवून चार महिने उलटले, तरीही काही शाळा शिक्षकाविना असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य वाऱ्यावर आहे. त्यामुळे शाळांना शिक्षक कधी मिळणार असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित करत, येत्या आठ दिवसांत शाळांवर शिक्षकांची नेमणूक झाली नाही तर राज्यशासनाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येतील, अशा इशारा सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिला. दरम्यान, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात शिक्षक नसणे ही लाजीरवाणी बाब असून, अशा भोंगळ्या कारभारामुळेच “विद्येच्या माहेरघराला’ कोणी शिक्षक देता का, शिक्षक अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्यात यंदा ग्रामविकास विभागाकडून ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील साधारण साडेसहा हजाराहून अधिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या होवून देखील, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काही शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध नव्हते. ही परिस्थिती आजही काही शाळांमध्ये असून, गेल्या चार महिन्यांपासून काही तालुक्‍यातील शाळांना शिक्षकच मिळाले नाही. तर, दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष यांना शिक्षक बदलीचे अधिकार नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षकांची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्याबाबत मंगळवारी (दि.11) झालेल्या सर्वसाधारण सभेत “शिक्षक बदली प्रकरण’ चांगलेच तापले.
त्यावेळी सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची शाळा घेतली.

ज्या शाळांना शिक्षक नाहीत त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बदली शिक्षक द्या, तुम्हाला अधिकार नसतील तर सर्वसाधारण सभेत ठराव करून अधिकाराचा वापर करा, शिक्षक येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. शाळा बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून शिक्षक दिले जात नाही? असा समज ग्रामस्थांमध्ये झालेला आहे. ज्या गावात शिक्षक नाही, त्याठिकाणी त्याच गावातील डीएड किंवा बीएड झालेल्या तरुणाची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करा, असे एकावर एक पर्याय देत सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. अखेर “शिक्षक मिळत नसतील तर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करून’ राज्य शासनाचा निषेध करू, असा इशारा गटनेते शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, रणजीत शिवतारे, विरधवल जगदाळे, प्रमोद काकडे आदींनी दिला.

राज्याच्या ग्रामविकासमंत्री आणि सचिव यांची भेट घेऊन शाळांना शिक्षक मिळण्याबाबत प्रस्ताव देऊ. येत्या आठ दिवसांमध्ये त्यावर ठोस निर्णय घेऊन शिक्षकांची नेमणूक करावी, अशी विनंती करू. त्यानुसार आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही तर पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन करत अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी सदस्यांना शांत केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याबाबत सूचना दिल्या.

जिल्हा परिषद पातळीवर शिक्षकांच्या परस्पर बदल्या करू शकत नाही. ते नियमात बसत नाही. त्यामुळे याबाबत ग्रामविकासमंत्री आणि सचिव यांच्याशी चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. आज 64 पिटीशयन कोर्टात दाखल आहे. त्यामुळे याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)