शाळा, महाविद्यालयांना “होमगार्ड काका’ देणार संरक्षण

शासन निर्णयाची अंमलबजावणी : “पोलीस काका’ योजनेनंतर उपक्रम

पुणे – शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनींना दिलासा देण्यासाठी होमगार्डचा बंदोबस्त देण्यात येणार आहे. त्याचे परिपत्रक शासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजवाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत “होमगार्ड काका’ विद्यार्थीनींचे संरक्षण करणार असून ते रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार आहेत.

-Ads-

गेल्या काही वर्षांत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयात जाताना हे रोडरोमिओ त्रास देत असल्याने बहुतांशी तरुणींना अर्धवट शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे. तर बहुतांशी तरुणींना त्यांचा जीव गमवावा लागला आहे; त्याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाच्या गृह विभागाने शाळा आणि महाविद्यालयात “पोलीस काका’ ही योजना सुरू केली होती. शाळा आणि महाविद्यालयात या पोलीस काकांची छायाचित्रे लावून त्यांचे मोबाइल नंबर प्रसिद्ध करण्यात आले होते. या अभिनव योजनेमुळे या रोडरोमिओंना काही प्रमाणात लगाम बसला होता. मात्र, शाळा आणि महाविद्यालयांच्या तुलनेत पोलीसांची संख्या खूपच अपुरी असल्याने हा प्रयोग काहीअंशी बारगळला होता. त्यामुळे अल्पावधीतच या रोडरोमिओंनी काही प्रमाणात डोके वर काढले होते. या प्रकाराची राज्य शासनाच्या गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे.

त्यानुसार या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये होमगार्ड जवानांचा बंदोबस्त पुरविण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करत आहे; संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि रोडरोमिओंचा सर्वाधिक वावर असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्वप्रथम हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. या होमगार्डना रोडरोमिंवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत; या जवानांचा शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात बंदोबस्त राहाणार असल्याने छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालणे शक्‍य होणार आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार काम करण्याची आमची तयारी आहे. असा बंदोबस्त दिल्यास शाळा आणि महाविद्यालयातील वातावरण अधिक सुरक्षित करण्यावर आणि विद्यार्थीनींना सुरक्षा देण्यावर आमचा भर असणार आहे.
– उत्तमराव साळवी, शहर समादेशक, होमगार्ड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)