शाळांना धान्यपुरवठा करण्यासाठी इ-निविदा प्रक्रिया जानेवारीअखेर

पुणे – राज्य शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना धान्यपुरवठा करण्याबाबतची इ-निविदा प्रक्रिया येत्या जानेवारीअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून ठेकेदारांना धान्यपुरवठा करण्याबाबतचे आदेश बजाविण्यात येणार आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार योजना दरवर्षी नियमितपणे राबविण्यात येत असते. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ व्हावी, शाळांकडे विद्यार्थी आकर्षित व्हावेत, शैक्षणिक दर्जात वाढ व्हावी आणि विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ व्हावी यादृष्टीने पोषण आहार योजना राबविली जाते. दरवर्षी धान्यपुरवठा करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात येत असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चालू वर्षी 30 नोव्हेंबरपर्यंतच ठेकेदारांना धान्यपुरवठा करण्याची मुदत होती. ही मुदत संपल्यामुळे धान्यपुरवठा करण्यासाठी नव्याने इ-निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून जिल्हानिहाय ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात एकूण 152 ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. या निविदांच्या कागदपत्रांची तांत्रिक छाननी सुरू करण्यात आलेली आहे. ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांनी दिलेले धान्याचे नमुने प्रयोगशाळेकडून तपासून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पात्र व अपात्र ठेकेदारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष धान्यपुरवठा करण्याबाबतचे आदेश देण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय खरेदी समितीमार्फत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे कामकाज केले जाते. या समितीच्या अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षण संचालक, तर सचिवपदी शिक्षण उपसंचालक यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. एकूण सात जणांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यातील 86 हजार, 400 शाळांना पोषण आहारातून विविध धान्यांचा पुरवठा करण्यात येतो. या शाळातील 1 कोटी, 10 लाख विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. 17 विविध प्रकारचे पदार्थ शाळांना पुरविण्यात येतात. यात तांदूळ, तूरडाळ, हरबराडाळ, चवळी, तेल, मीठ, मसाला, हळदी यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो.

येत्या जानेवारीपर्यंत धान्यपुरवठा करण्यासाठी जुन्या 35 ठेकेदारांनाच मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळांना नियमित धान्यपुरवठा करण्यात येत असून एकाही शाळेला धान्याची टंचाई भासणार नाही याची खबरदारी बाळगण्यात आलेली आहे, अशी माहिती शालेय पोषण आहार योजना विभागाचे अधीक्षक सुरेश वाघमोडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)