शाळांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटबाबत शिक्षण विभाग ढिम्म

संचालक, उपसंचालक, शिक्षणाधारी नॉट रिचेबल
पुणे – अहमदनगरमधील शाळेची भिंत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाही शिक्षण विभागाला नेमक्‍या किती शाळांचे ऑडिट झाले याची उत्तरे देणे अवघड वाटत आहे. शिक्षणाधिकारी पातळीपासून राज्याच्या शिक्षण संचालकांना या प्रश्‍नाबाबत उत्तरे देण्यासाठी वेळ नसल्याचे सध्या दिसत आहे.

अहमदनगरमधील जिल्हा परिदेची शाळा सोमवारी कोसळली असून त्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर शिक्षिकांसह सोळा जण जखमी आहेत. असे असताना शिक्षण विभागाला या प्रकरणाची चौकशी करावीशी वाटत नाही का? असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. खरे तर मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने शासन निर्णय काढत राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करुन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. बांधकाम अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार दर तीन ते पाच वर्षांनी इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. तसेच शासनाने काढलेल्या निर्णयानुसार तर राज्यातील सर्व शाळांचे ऑडिट मागील वर्षी होणे गरजेचे होते. मात्र तसे सध्या तरी झालेले दिसत नाही.

शासन निर्णयानुसार दोषी असणाऱ्या अहमदनगरच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबत शिक्षण विभाग मात्र मूग गिळून गप्प असल्याचे दिसते आहे. दरम्यान याबाबत विचारणा करण्याकरिता अहमदनगरचे शिक्षणाधिकारी विवेकानंद काटमोरे यांच्याशी सातत्याने संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. राजीव गांधी विमा योजनेंतर्गत आता मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये मिळणार आहेत. तर जखमींना मात्र या योजनेंतर्गत कोणतीही भरपाई देण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

अहमदनगरमधील घटनेबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या शाळेजवळून नाला वाहत होता, त्यामुळे ही घटना घडली आहे. मात्र नाल्यावर किंवा त्याच्या शेजारी बांधकाम करण्याची परवानगी दिलीच कशी असा प्रश्‍न आता निर्माण होतो आहे. तर काही शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत शाळा आहेत, मात्र त्याची शिक्षणाधिकाऱ्यांकडून अद्यापही दखल घेतली जात नाहीये.

 

मी एवढेच सांगू शकतो की राजीव गांधी विमा योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून 75 हजार रुपये मिळतात. बाकी शाळांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले होते का व यामध्ये दोषी कोण आहेत याबाबत शिक्षणधिकाऱ्यांना विचारा
दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक

अहमदनगरला झालेली शाळेच्या पडछडीची बातमी मला वृत्तपत्रातून समजली पण स्ट्रस्टचल ऑडिट झाले की नाही मी सांगू शकत नाही मी मिटींगमध्ये आहे.
सुनिल चौहान, प्रभारी राज्य शिक्षण संचालक (प्राथमिक)

पुणे पालिकेच्या शाळांचे नियमित स्ट्रक्‍चरल ऑडिट होते आहे. यापूर्वी 2013 ला ऑडिट झाले होते त्यानंतर आता 2017 ला पुन्हा हे ऑडिट केले जाणार आहे. 2013 साली झालेल्या ऑडिटमध्ये तीन शाळा धोकादायक स्थितीत होत्या त्यातून विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्यात आले आहे. दरम्यान यावर्षी 153 पालिकेच्या शाळांचे ऑडिट करण्याचे पत्र आम्हाला मिळाले असून त्यानुसार लवकरच आम्ही काम सुरु करत आहोत.
संदिप खांदवे, अधिक्षक अभियंता
भवन विभाग, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)