शाळांच्या सहली सर्रास विनापरवाना

पुणे – शाळा व महाविद्यालयांकडून शिक्षण विभागाचे आदेश धुडकावत विना परवानगी सर्रासपणे शैक्षणिक सहली काढल्या जात आहेत. याला लगाम घालण्यात शिक्षण विभागाला यश मिळत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली काढण्यात येतात. मागील काही वर्षांमध्ये सहलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अपघातासह इतर अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसाठी परवानगी घेण्याचे बंधन शाळा व महाविद्यालयांना घातले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक, प्राचार्य यांना 2 महिन्यांपूर्वीच लेखी आदेश बजाविण्यात आलेले आहेत.

पर्यटन व मनोरंजनात्मक अशा नैसर्गिक स्थळी सहली काढण्याऐवजी शैक्षणिक, अभ्यासात्मक आणि संशोधनात्मक स्थळी सहली काढण्याची सक्‍ती शाळा व महाविद्यालयांना घालण्यात आलेली आहे. सहलीच्या मान्यतेसाठी स्थानिक पातळीवरील शिक्षणाधिकाऱ्याकडे सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्याध्यापक, प्राचार्यांना देण्यात आलेल्या आहेत. प्राचार्यांचे शिफारस पत्र, स्थळाची माहिती, संस्था व्यवस्थापनाच्या परवानगीचे पत्र, विद्यार्थ्यांच्या यादीसह आरटीओ पासिंग परवाना, पालकांचे व विद्यार्थ्यांचे संमतीपत्र, सहलीचे एकूण अंतर व कालावधी, विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती, प्रथमोपचार पेटी, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रे, विद्यार्थ्यांच्या रक्‍तगटाची माहिती आदी कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

आता सहलींचा हंगाम सुरू झालेला आहे. बऱ्याचशा शाळा, महाविद्यालयांच्या दररोज सहली काढल्या जात आहेत. सहलीच्या बसेस रस्त्यारून जात असल्याचे अनेकदा आढळून येत आहे.

शाळा, महाविद्यालयांकडून शिक्षण विभागाकडे सहलीच्या परवानगीसाठी प्रस्तावच सादर केले जात नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. दोन-चारच प्रस्ताव सध्या दाखल झाले आहेत. सहलीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक, प्राचार्यांवरच राहणार आहे. त्यामुळे विनापरवाना सहलीचे आयोजन करणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिला आहे. प्रस्तावास मान्यता घेऊनच सहली काढव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)