शाळांची अध्ययनस्तर तपासणी

शिक्षण विभागची माहिती : विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा संकल्प

पिंपरी – महापालिका शाळांमधील अप्रगत विद्यार्थ्याना प्रगत करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत. यासाठी, शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर तपासणी सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या 35 शाळांची तपासणी करण्यात आली असून लवकरात-लवकर 105 शाळा पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण समितीतर्फे गेल्या वर्षी शाळा भेट हा उपक्रम राबविण्यात आलेला होता. या माध्यमातून महापालिकेच्या सर्व शाळांना भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. सध्या शहरातील काही शाळांना डिजिटल माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. तसेच, शहरातील तीन शाळांना आय.एस.ओ मानांकन मिळाले आहे. यामुळे, महापालिका शहरातील शाळांमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमाचा फायदा निश्‍चितपणे विद्यार्थ्यांना झाल्याचे दिसून आले.

महापालिकेतर्फे गेल्या सहा महिन्यापासून सुरु केलेल्या शाळा भेट या उपक्रमात काही विद्यार्थी अप्रगत असल्याचे दिसून आले होते. या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षणाधिकारी, सभापती, पर्यवेक्षक व विषयतज्ञ शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच, शैक्षणिक चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची गुणात्मक माहिती घेत आहेत. याधून, विषयतज्ञांना विद्यार्थी गुणात्मकरित्या कोणत्या स्तरामध्ये आहे याची माहिती मिळते. ज्या विद्यार्थ्यांचा स्तर खाली आहे त्यांना प्रगत करण्यासाठी विविध चाचण्या घेतल्या जातात. अध्ययन स्तर तपासणीमधून अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मूलभूत क्षमता विकास कार्यशाळा घेण्यात आली होती.

अध्ययन स्तर तपासणी करण्याची पध्दत
अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सुरु केलेली अध्ययन स्तर तपासणीमध्ये मराठी, उर्दू, गणित व इतर विषयांचा समावेश केला आहे. मराठी विषयाचा स्तर तपासण्यासाठी जोडशब्द, अक्षरांची ओळख, मुळाक्षरे आदींबाबत प्रश्‍न विचारले जातात. तसेच, चित्राच्या माध्यमातून शिकविले जाते. याचबरोबर, विद्यार्थ्यांशी संवाद वाढण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक विविध विषयावर चर्चा केली जाते. अध्ययन स्तर तपासणीमध्ये प्रत्येक अप्रगत विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित केल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार आहे.

महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून येते. परंतु, जे विद्यार्थी अप्रगत आहेत त्यांना प्रगत करण्यासाठी अध्ययन स्तर तपासणी सुरु केलेली आहे. यामुळे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्‍चितपणे वाढणार आहे.
– ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)