शालेय स्पर्धेतून वगळले 41 खेळ

क्रीडा संघटना आक्रमक : राज्य शासनाचा केला निषेध

पिंपरी – शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय तसेच क्रीडा युवक सेवा संचलनालयाने 41 प्रकारच्या खेळांना शालेय स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविल्याने क्रीडा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शासनाच्या या मनमानी धोरणाच्या विरोधात क्रीडा संघटनांनी आंदोलनाचा इशारा देत शासनाचा जाहीर निषेध केला आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या निर्णयातील तरतुदीनुसार क्रीडा व युवक सेवा संचनालयाच्या आयुक्तांनी 41 क्रीडा प्रकार शालेय स्पर्धेत समाविष्ठ करण्याची मान्यता दिली होती. आदेशातील अटी व शर्तीनुसार क्रीडा संघटनांनी राज्यस्तरीय व जिल्हा विभाग स्तरीय स्पर्धा आयोजनासाठी लागणारा खर्च करणे, अकरावीमध्ये प्रवेश ग्रेसगुण देणे, शासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षण, जिल्हा व राज्य स्तरावरील देण्यात येणारे क्रीडा पुरस्कार व शासनाच्या अन्य योजनांचा लाभ देखील खेळाडू घेत होते. मात्र, राज्य शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने हे 41 खेळ शालेय क्रीडा स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार या 41 खेळांचे खेळाडू या सर्व लाभांपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेत असलेल्या 7 लाख 38 हजार खेळाडूंवर अन्याय होणार आहे. यामुळे 41 खेळ प्रकारच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

राज्य शासनाच्या या मनमानी कारभाराचा शहरातील तसेच शहराबाहेरील 41 क्रीडा संघटनांनी पिंपरी-चिंचवड येथे एकत्र येऊन नुकताच निषेध केला. या निषेध सभेचे आयोजन थायबॉक्‍सींग महाराष्ट्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष पी. वाय. अत्तार यांनी केले. यावेळी बुडो फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाकरण पनीकर, लतेंद्र भिंगारे, लहू पारवे व विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आंदोलनाला युवा आधार संघटना व महाराष्ट्र शारीरिक शिक्षक शिक्षक संस्थेने पाठिंबा दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)