शालेय स्पर्धा, वन मिलियन फुटबॉल कार्यक्रमावर बहिष्कार

क्रीडा तासिका पूर्ववत होण्यासाठी एल्गार ः नगर, पारनेर क्रीडाशिक्षकांचा निर्णय

नगर – विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाबरोबर शारीरिक विकास होण्यासाठी विद्यार्थी मैदानावर टिकणे आवश्‍यक आहे. असे असताना शासनाने कुठल्याही तज्ज्ञ समितीची शिफारस नसताना कला, क्रीडा विषयांच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होऊन विद्यार्थी हतबल होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांत अभिरुची निर्माण करणाऱ्या व शारीरिक तंदुरुस्ती टिकविणाऱ्या विषयाच्या तासिका पूर्ववत व्हाव्यात म्हणून निवेदने, आंदोलने करूनही शासन कुठलीच दखल घेत नसल्याने शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धेवर व पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्‍ट फुटबॉल वन मिलियन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर येथे झालेल्या बहिष्कार सभेत एकमुखी घेण्यात आला. बहिष्काराचे निवेदन नगर, पारनेर तालुक्‍यातील शिक्षकांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांना देण्यात आले.

28 एप्रिलच्या परिपत्रकाने कला-क्रीडा विषयांच्या तासिका कमी केल्या असून आर.टी.ई.नुसार आठवीपर्यंत कला, क्रीडा विषयास शिक्षक न ठेवल्याने भविष्यात मुले मैदानावर खेळण्याऐवजी टीव्ही, मोबाइलच्या आहारी जाऊन पुढील अनेक पिढ्या बरबाद होणार असल्याने पालकांनी या लढ्यात उतरावे, असे आवाहन क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले. उदय जोशी यांना निवेदन देऊन बैठकीवर पूर्ण बहिष्कार घालण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र हिंगे, दत्तात्रेय औटी, बापू होळकर, राजेंद्र कोतकर, दादासाहेब दुसुंगे, विजय जाधव, प्रताप बांडे, शिरीष टेकाडे, उन्मेश शिंदे, दत्तात्रेय नारळे, संजय कुसकर, भाऊ धावडे, महादेव साबळे, विनायक उंडे, बाबासाहेब म्हस्के, गाजरे, बापू जगताप, नाना डोंगरे, ढमढेरे, मंगेश ठोंबळ, आदींसह क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)