शालेय शिक्षणाची वाटचाल आणि भविष्यातील आव्हाने…

वीस वर्षानंतर जग कसे असेल हे माहीत नसल्याने असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारी पिढी तयार करण्याचे शिवधनुष्य शिक्षकांना पेलावे लागेल. शिक्षणातून केवळ बाजाराची गरज भागवणारे विद्यार्थी घडवणे इतकेच उद्दिष्ट ठेवून चालणार नाही. पारिवारिक, सामाजिक व राष्ट्रीय भान राखणारी पिढी निर्माण करताना सुयोग्य संस्कारांचे बीजारोपण करणे हेदेखील महत्वाचे असेल. 

एक काळ असा होता की, शालेय शिक्षण घेण्यासाठीही मुलांना तालुक्‍याच्या गावी जावे लागत होते. कालांतराने शिक्षणाचे दरवाजे ग्रामीण भागातही उघडले. जिल्हा परिषद, रयत शिक्षण संस्था, जिल्हा मराठा, हिंद सेवा मंडळ, सह्याद्री बहुजन शिक्षण प्रसारक संस्था, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था अशा संस्थांच्या माध्यमातून शिक्षणगंगा गावोगावी पोहोचली. इंग्रजी माध्यमाच्या शाळा कालांतराने सुरू झाल्या. मिशनरी शिक्षण संस्थांच्या इंग्रजी शाळा व सोबतच सहकारी साखर कारखान्यांनी सुरू केलेल्या आधुनिक इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांनी पालकांना आकर्षित करायला सुरुवात केली.

सन 1980 ते 2000 हा कालखंड निवासी इंग्रजी शाळांनी गाजवला. शतकाच्या स्थित्यंतरासोबतच शालेय शिक्षणातही बदलाचे वारे वाहू लागले. अनेक सीबीएसई शाळा जिल्ह्यात उभ्या राहू लागल्या. घोकंपट्टी करुन गुणराशी कमावण्यापेक्षा प्रयोगातून आणि समजावून घेऊन ज्ञान कमावणे अधिक महत्त्वाचे आहे या विचाराशी पालक सहमत होऊ लागले. संगमनेरची ध्रुव ऍकॅडमी या विचारांनी सुरू झालेली पहिली शाळा ठरली. हॉवर्ड गार्डनरच्या बहुविध बुध्दिमत्तेच्या सिध्दांतावर आधारित विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा धांडोळा घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक अशा ध्रुव ऍकॅडमीने आपल्या प्रयोगशीलतेने सर्वांचे लक्ष वेधले. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाच्या ध्रुवने केलेल्या प्रयोगाने देशातील मूल्यमापन पध्दती बदलण्याचे मार्गदर्शन दिले.

संगीत, क्रीडा, नाट्य, नृत्य, कला, निसर्ग भटकंती या विषयातही भरीव कामगिरी ध्रुव ऍकॅडमीने केली. संगमनेरात स्ट्रॉबेरी, अमृतवाहिनी, कोपरगावात समता, आत्मा मलिक, ओम गुरुदेव, लोणीमध्ये लिटील फ्लॉवर अशा अनेक शाळा या कालखंडात सुरू झाल्या. राहात्यामधील साध्वी प्रितीसुधाजी, नेवाशातील घाडगे पाटील, अकोल्यातील अभिनव स्कूल अशा मोठ्या परिसराच्या शाळांनी आपापले वेगळेपण सिध्द केले. प्रत्येकाला मग ती व्यक्ती असो की व्यवस्था, काळानुरुप बदलावेच लागते. न बदलणारे मागे पडतात व काळाच्या ओघात नष्ट होतात. शिक्षण व्यवस्था देखील याला अपवाद नाही. या दृष्टीने अनेक जिल्हा परिषद शाळा देखील कात टाकताना दिसत आहेत. केवळ डिजिटल होणे व प्रोजेक्‍टरच्या सहाय्याने अभ्यासक्रम शिकवणे हा या बदलांचा एक भाग असू शकेल पण, एकूणच बदलणाऱ्या काळाचा वेध घेऊन मानसिकता बदलणे आता आवश्‍यक असणार आहे.

माहितीचा संचय म्हणजे शिक्षण ही व्याख्या बदलावी लागणार आहे. माहितीचा महासागर आता गुगलवर उपलब्ध आहे. मुलांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न होतील अशी व्यवस्था उभी करणे, मुलांना सहज प्रश्‍न विचारता येतील अशी निर्भयता त्यांच्या मनात निर्माण करणे, प्रश्‍नांची सरळ उत्तरे न सांगता ती कोठे शोधावीत याचे मार्गदर्शन उपलब्ध करुन तशा व्यवस्था ग्रंथालयात, संगणकावर, प्रयोगशाळांमधून, क्षेत्रभेटीत किंवा शाळाबाह्य घटकांमधून उभ्या कराव्या लागतील. एकाच प्रश्‍नाची अनेक उत्तरे सापडतील. त्यातले सुयोग्य उत्तर कोणते याची निर्णयक्षमता विकसित करावी लागेल. घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही व्हावी यासाठी शारीरिक, बौध्दिक, मानसिक व आत्मिक क्षमता वाढवावी लागेल. अशी शिक्षण व्यवस्था ही चाकोरीबाहेरची असेल पण ती अंगीकारण्याची हिंमत शिक्षण संस्थांना दाखवावी लागेल.

पालकांचे प्रबोधन करावे लागेल. त्यांच्या विश्‍वासास पात्र व्हावे लागेल. वीस वर्षानंतर जग कसे असेल हे माहीत नसल्याने असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारी पिढी तयार करण्याचे शिवधनुष्य शिक्षकांना पेलावे लागेल. शिक्षणातून केवळ बाजाराची गरज भागवणारे विद्यार्थी घडवणे इतकेच उद्दिष्ट ठेवून चालणार नाही. पारिवारिक, सामाजिक व राष्ट्रीय भान राखणारी पिढी निर्माण करताना सुयोग्य संस्कारांचे बीजारोपण करणे हेदेखील महत्वाचे असेल. हे समत्व साधण्यासाठी भारतीय संस्कृती मनात रुजवावी लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना शाश्‍वत मूल्य विसरुन चालणार नाही. जागतिक दर्जाच्या सुविधा देत असताना स्थानिक परिस्थिती आणि संस्कृती स्मरणात ठेवावी लागेल. मुलांमध्ये उपजत असलेल्या गुणांची पारख करुन प्रत्येक मुलातील हिऱ्याला पैलू पाडत, त्याला सुयोग्य कोंदण देण्याचे भगीरथ कार्य शिक्षकांना करावे लागेल. सदैव प्रागतिक असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण संस्था बदलांचे हे आव्हान नक्कीच पेलतील हा विश्‍वास आहे.

 

 

 

 

– डॉ. संजय मालपाणी 
संगमनेर, मालपाणी उद्योग समूह 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)